किटवाड धरणात बेळगावचा तरुण बुडाला, शोधमोहिम सुरु, यंदाची दुसरी घटना - चंदगड लाईव्ह न्युज

20 December 2020

किटवाड धरणात बेळगावचा तरुण बुडाला, शोधमोहिम सुरु, यंदाची दुसरी घटना

                                                      अभिषेक उर्फ आप्पाजी सज्जन

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

           किटवाड (ता. चंदगड) येथील एक नंबर धरणातील झिगझॅग भिंतीलगत बेळगावचा तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना आज रविवार दि. २० रोजी दुपारी २.३० वाजता घडली. अभिषेक उर्फ आप्पाजी सज्जन वय २४, रा. माळ मारुती, श्रीनगर एरिया, बेळगाव असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. तो घरातील सदस्यां सोबत पिकनिक साठी किटवाड धबधबा व धरणा वर आला होता. दुपारी अडीच वाजता भिंतीलगत धरणातील जलाशयात पोहण्यास गेला होता. पण पोहता न आल्याने तो बुडाला. मृतदेह शोधण्यासाठी अंधार पडेपर्यंत रेस्क्यू फोर्स च्या जवानांनी प्रयत्न केले पण यश आले नाही. यावेळी पोलीस पथक व अॅम्ब्यूलन्स तैनात होती तथापि उशिरापर्यंत मृतदेह हाती न आल्याने उपयोग झाला नाही. उद्या सकाळी शोध मोहीम पुन्हा राबविण्यात येणार आहे.

                               याच झिगजॅग भिंतीलगत च्या पाण्यात अभिषेक सज्जन हा युवक बुडाला आहे.

         एक नंबर धरणाच्या सांडव्यात बांधलेली महाराष्ट्रातील ही केवळ दुसरी भिंत आहे. याच भिंतीवरून उड्या मारून पर्यटक तरुण पोहण्याचा आनंद लुटत असतात. दोन महिन्यांपूर्वी बेळगाव रेल्वे स्टेशनचा एक कर्मचारी येथील धबधब्यात पडून मृत झाला होता. यंदाच्या वर्षातील ही दुसरी घटना ठरली. यामुळे किटवाड पर्यटन क्षेत्राची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.

No comments:

Post a Comment