१५ फेब्रुवारी - अभिनेते कृष्णकांत दळवी यांचा जन्मदिन, जाणून घेवून त्यांच्या जीवन प्रवासाविषयी? - चंदगड लाईव्ह न्युज

15 February 2021

१५ फेब्रुवारी - अभिनेते कृष्णकांत दळवी यांचा जन्मदिन, जाणून घेवून त्यांच्या जीवन प्रवासाविषयी?

अभिनेते कृष्णकांत दळवी 


नंदकुमार ढेरे / सी. एल. वृत्तसेवा चंदगड

       अडकूर (ता. चंदगड) येथे लाल मातीत जन्मालेले व मराठी नाटक-चित्रपटांत काम करणारे अभिनेते कृष्णकांत दळवी यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९२४ अडकूर ता चंदगड येथे झाला.

      कृष्णकांत दळवी हे मास्टर दत्ताराम यांचे चेले होते. ते अभिनेते चेतन दळवी यांचे काका. ते पार्श्वगायकही होते. कृष्णकांत दळवी हे कृष्णधवल आणि रंगीत चित्रपटांच्या युगाला जोडणारे तसेच रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमा मध्ये तेवढ्याच आत्मविश्वासाने वावरलेले अभिनेते होते.

      कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील अडकूर हे दळवी यांचे मूळ गाव. रेल्वेतील नोकरीच्या निमित्ताने ते मुंबईत आले आणि नोकरी करता करता अभिनयाची आवड जोपासली. देखणे आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व असल्यामुळे त्यांना चित्रपट आणि रंगभूमी अशा दोन्हीकडे भूमिका मिळत गेल्या. गिरणगाव, कामगार रंगभूमी आणि लोक रंगभूमी या त्या काळातल्या कलाकार घडवणाऱ्या शाळाच होत्या.

               कृष्णकांत दळवी यांनी शाहीर साबळे यांच्या कलापथकात काम केले. ज्या काळात सबंध कार्यक्रमाची बिदागी तीस रुपये मिळायची, तेव्हा ते नाइटचे पाच रुपये घ्यायचे आणि त्यावेळी त्यांची मागणी दहा रुपयांची होती, यावरून साठच्या सुमारास ते किती महत्त्वाचे कलावंत होते हे लक्षात येते.

          ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकातील त्यांची संभाजीची भूमिका गाजली. १९६२ मध्ये यातील १६ वर्षे वयाच्या संभाजींची भूमिका साकारताना दळवी ३७ वर्षांचे होते, या नाटकाचे एक हजाराहून अधिक प्रयोग करून ते निवृत्त झाले तेव्हा त्यांचे वय ६२ वर्षे होते. एक भूमिका सलग २५ वर्षे करण्याची त्यांची ही कामगिरी त्यांना मराठी रंगभूमीवरील अशा मोजक्या अभिनेत्यांच्या पंगतीला नेऊन बसवते.

      शिवाजी सावंत यांच्या ‘मृत्युंजय’ कादंबरीवरील नाटक १९७९ मध्ये रंगभूमीवर आले. 'मृत्युंजय'ची निर्मिती ठाण्याचे रमाकांत राक्षे यांनी केली होती. मात्र, प्रयोग सुरू असतानाच त्यांचे आकस्मिक निधन झाले आणि नंतर मोहन वाघ यांच्या 'चंद्रलेखा' कडे ते नाटक आले. या नाटकातली बाळ धुरी यांची कर्णाची प्रमुख भूमिका लक्षणीय ठरली तशीच दुर्योधनाची भूमिकाही गाजली. श्रीकांत मोघे यांच्यानंतर कृष्णकांत दळवी यांनी ती भूमिका साकारली.

       नटसम्राट, पालो फकीर, वेडा वृंदावन, छावा, हॅम्लेट, लग्नाची बेडी, देवमाणूस; अशा अनेक नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या. मुरली मल्हार रायाची, सतीचं वाण, दाम करी काम, निर्मला, सासुरवाशीण, वावटळ आदी चित्रपटांमधून त्यांनी नायकाची भूमिका केल्या. त्याशिवाय पिंजरा, ज्ञानबा तुकाराम, दृष्टी जगाची निराळी, वधुपरीक्षा, शिवरायाची सून ताराराणी, नाते मामा भाचीचे, छोटा जवान, वाट चुकलेले नवरे, आंधळा मारतोय डोळा आदी चित्रपटांमध्येही त्यांच्या लक्षवेधी भूमिका होत्या.

         कृष्णकांत दळवी ज्या काळात सक्रिय होते, तेव्हा चित्रपट तंत्रदृष्ट्या प्रगत नव्हते, त्यामुळे सारी भिस्त दिग्दर्शक, संवादलेखक आणि मुख्य अभिनेत्यावर असायची. अशा काळात त्यांनी यशस्वी मराठी चित्रपट दिले. रेल्वेमधून १९८३ मध्ये निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी रंगभूमीशी नाते टिकवले. अखेरच्या काळात मात्र ते अडकूर या जन्मगावी परतले. कृष्णकांत दळवी यांचे ४ ऑक्टोबर २०१५ रोजी निधन झाले.





No comments:

Post a Comment