ढोलगरवाडी सर्पोद्यानची मान्यता 'सेंट्रल झू' कडून अबाधित, अटींच्या पूर्ततेसाठी मुदतवाढ - चंदगड लाईव्ह न्युज

14 May 2021

ढोलगरवाडी सर्पोद्यानची मान्यता 'सेंट्रल झू' कडून अबाधित, अटींच्या पूर्ततेसाठी मुदतवाढ

संग्रहित छायाचित्र


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

        ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील सर्पोद्यानची 'झू अथॉरिटी ऑफ इंडिया' ने रद्द केलेली मान्यता नियम व अटींची पूर्तता करण्याच्या सूचनेसह पुन्हा एकदा बहाल केली आहे. दोन वेळा मान्यता रद्द झाल्यामुळे याविषयी  उत्सुकता होती. तथापी नव्या पत्रामुळे सर्प प्रेमींमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. शेतकरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सर्पालय कार्याध्यक्ष तानाजी वाघमारे यांच्या प्रयत्नांना यामुळे यश आले आहे.

         डॉ. सोनाली घोष डेप्युटी  इंस्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट नवी दिल्ली यांच्या पत्रास अनुसरून एस एन माळी, मुख्य वनसंरक्षक तथा सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण नागपूर यांचे पत्र नुकतेच प्राप्त झाल्याची माहिती तानाजी वाघमारे यांनी दिली.

       गेल्या ६० वर्षांपासून ढोलगरवाडी येथे आद्य सर्पमित्र कै बाबुराव टक्केकर यांनी स्थापन केलेल्या सर्पोद्यानच्या माध्यमातून साप हा माणसाचा शत्रू नसून मित्र आहे, त्याच्याविषयीच्या अंधश्रद्धा दूर करून साप ही एक राष्ट्रीय संपत्ती आहे. हा विचार जनमानसात रुजवण्याचे कार्य केले आहे. याबरोबरच ते महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातील वनविभाग, पोलीस खाते, भारतीय सैन्य दल, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, डॉक्टर, शेतकरी व नागरिकांसाठी माहिती, अभ्यास व संशोधन केंद्र बनले आहे. शेतकरी शिक्षण मंडळाच्या माध्यमातून तानाजी वाघमारे सर्पालयाचे रूपांतर पर्यटन केंद्रात करू पाहत आहेत. तसे झाल्यास ही बाब चंदगड तालुका, कोल्हापूर जिल्हा व महाराष्ट्र शासनाला भूषणावह ठरणारी असून शासनस्तरावरून याला आवश्यक असणारी किमान २५ हेक्‍टर जमीन व  निधी पूर्ततेला गती मिळाली पाहिजे. 

        या सर्पोद्यानची स्थापना टक्केकर यांनी १९६६ ला केली मात्र १९७२ साली अस्तित्वात आलेल्या वन्य जीव संरक्षण  कायद्याचा आधार घेत हे सर्पोद्यान अटींची पूर्तता करत नसल्याच्या कारणास्तव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशास अनुसरून महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण व केंद्रीय चिडियाघर प्राधिकरण (सेंट्रल झू) CZA यांनी २० नोव्हेंबर २०२० च्या पत्राने दुसऱ्यांदा मान्यता रद्द केली होती.  त्यानंतर तानाजी वाघमारे यांची सर्पोद्यानची मान्यता पुन्हा मिळवण्यासह अटींच्या पूर्ततेसाठी धडपड सुरू आहे. याला ग्रामविकास मंत्री ना मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, संजय मंडलिक, धैर्यशील माने, संभाजीराजे छत्रपती, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रांत, तहसीलदार आदींनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी प्रत्यक्षात कार्यवाही होणे गरजेचे आहे.  

         मान्यता अबाधित ठेवणे कामी चंदगड तालुका पत्रकार संघ व तालुक्यातील पत्रकारांसह कर्नाटक व गोवा राज्यातील आमदार, खासदार आदींचे मौलिक सहकार्य लाभल्याचे वाघमारे यांनी सांगितले. 

        आपले सर्वस्व पणास लावून टक्केकर कुटुंबीयांनी पाच दशके जतन केलेल्या सर्पालयाची प्रचलित नियम व अटींच्या पूर्ततेसाठी शासनस्तरावरून बळकटी मिळाल्यास हे ठिकाण अभ्यास व संशोधन केंद्रासह आगळेवेगळे पर्यटन केंद्र म्हणूनही जगाच्या नकाशावर झळकण्यास वेळ लागणार नाही.



No comments:

Post a Comment