दौलत-अथर्व कंपनीच्या तोडणी-वाहतूक करारास प्रारंभ, सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट - अध्यक्ष मानसिंग खोराटे - चंदगड लाईव्ह न्युज

14 May 2021

दौलत-अथर्व कंपनीच्या तोडणी-वाहतूक करारास प्रारंभ, सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट - अध्यक्ष मानसिंग खोराटे

हलकर्णी ता चंदगड येथील दौलत-अथर्व च्या कार्यस्थळावर सन २०२१-२२ हंगामासाठी तोडणी-वहातूक करार शुभारंभ प्रसंगी अध्यक्ष मानसिंग खोराटे, संचालक पृथ्वीराज खोराटे,युनिट हेड धनंजय जगताप आदी.

नंदकुमार ढेरे / चंदगड - प्रतिनिधी

       हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत-अथर्व इंटरट्रेड कंपनीला सन २०२१-२२ या हंगामासाठी ऊस पूरवठा करण्यासाठी आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर  तोडणी- वाहतूक कराराचा शुभारंभ कंपनीचे अध्यक्ष  मानसिंग खोराटे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.  

          प्रारंभी  तोडणी वाहतूक कंत्राटदार प्रतिनिधी यांनी लक्ष्मी प्रतिमा पूजन केले. यावेळी  मानसिंग खोराटे म्हणाले, ``गेल्या हंगामात तोडणी वाहतूक कंत्राटदारांच्या  सहकार्यामुळेच ४.३१ लाख टन उसाचे गाळप होऊन हंगामा यशस्वी झाला.  या हंगामातही चांगले सहकार्य करून जास्तीत जास्त ऊसाचा पुरवठा कारखान्यास करावा. शेतकरी, तोडणी-वाहतुक यंत्रणेच्या सहकार्यावर व्यवस्थापनाने ६.०० लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. नवीन व्यवस्थापनाखाली कारखान्याचे आजवर केवळ दोनच हंगाम पूर्ण केले असूनही इतक्या अल्प कालावधीत कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. 

      गेल्या हंगामातील ऊस उत्पादकांची तसेच तोडणी वाहतूक कंत्राटदारांची सर्व बिले कारखान्याने यापूर्वीच अदा केली असून असे करणारा याभागातील हा पहिलाच कारखाना असावा, असे श्री. खोराटे म्हणाले. तसेच तोडणी वाहतूक कंत्राटदारांच्या कमिशन व डिपॉझिटची रक्कमही येत्या १७ तारखेस संबंधितांच्या बँक खात्यावर थेट जमा केली जाईल अशी माहिती  दिली. सध्याच्या काळात फक्त साखर उत्पादनावर कारखाना चालवणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसल्याने उप - पदार्थ निर्मिती करून उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणे आवश्यक आहे. म्हणूच कारखान्याने डिस्टीलरीच्या आधुनिकीकरणाचा इथेनॉल निर्मिती प्रकल्प हाती घेतल्याचे श्री खोराटे यांनी सांगून  भविष्यातही आणखी काही प्रकल्प हाती घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी तसेच कामगार यांनाही त्याचा आर्थिक लाभ होऊ शकेल. यावेळी संचालक पृथ्वीराज खोराटे, युनिट हेड  धनंजय जगताप, केन मॅनेजर  एस. एन. गदळे, फायनान्स मॅनेजर बी. एन. कदम, एच. आर. मॅनेजर जी. एस. पाटील, अधिकारी, कर्मचारी व तोडणी वाहतुकदार  उपस्थित होते.



No comments:

Post a Comment