चंदगडात कोरोना ड्युटीवरील शिक्षकांत असुरक्षिततेची भावना स्वतंत्र आदेश व सुरक्षा साधने देण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

16 May 2021

चंदगडात कोरोना ड्युटीवरील शिक्षकांत असुरक्षिततेची भावना स्वतंत्र आदेश व सुरक्षा साधने देण्याची मागणी

करंजगाव येथील प्रतिबंधित क्षेत्र

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर  सुरू आहे. यावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागासह शासनाचे सर्व विभाग युद्धपातळीवर कामाला लागले आहेत. त्यांच्यावरील ताण कमी करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्राथमिक, माध्यमिक, नपा, मनपा, शिक्षकांना विविध ठिकाणी कामगिरी देण्यात आली आहे. यात जिल्हा व राज्य सीमांवरील तपासणी नाक्यांवर पोलिसांसोबत शिक्षक अहोरात्र तैनात आहेत. कोरोना काळातही बी. एल. ओ. ची कामे थांबलेली नाहीत. आता लसीकरण केंद्रांवर सहाय्यक, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, १८ ते ४४ वयोगट व ४५ वर्षावरील व्यक्तींच्या नावांच्या याद्या करणे, लसीकरणाच्याा नोंदी ठेवणे. हॉट स्पॉट सर्वे, आदी कामे देण्यात आली आहेत. तथापि या शिक्षकांना अनेक वेळा मागणी करूनही फेस शील्ड, मास्क, सॅनिटायझर अशा प्राथमिक सुविधाही दिलेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षक वर्गात प्रचंड नाराजी आहे. वारंवार पॉझिटिव रुग्णांच्या संपर्कात जावे लागत असल्याने जीवावर उदार होऊनच कामगिरी पार पाडावी लागत आहे. चंदगड तालुक्यातील अनेक शिक्षक लस घेऊनही पॉझिटिव्ह आले असून मृत्यूशी झुंज देत आहेत.

          शिक्षक संघटनांनी गत वर्षीपासून शिक्षकांना तोंडी किंवा व्हाट्सअप वरून आदेश न देता वैयक्तिक नावाने लेखी आदेश देण्याची मागणी केली होती. त्याची  अद्यापि अंमलबजावणी नाही. मात्र शिक्षकांच्या मृत्युनंतर प्रस्ताव सादर करताना हेच अधिकारी आदेशाची प्रत जोडल्याशिवाय प्रस्ताव स्वीकारत नाहीत. कामगिरी देताना वैयक्तिक लेखी आदेश व पूर्ण झाल्यानंतर सक्षम अधिकाऱ्यांच्या सहीचे प्रमाणपत्र मिळावे. अशी मागणी शिक्षक व शिक्षक संघटनांनी केली आहे.

       आरोग्य व पोलीस आदी कर्मचाऱ्यांना मृत्युपश्चात असलेले ५० लाखांचे विमा संरक्षण शिक्षकांना देण्याबाबत शासनाकडून अद्याप स्पष्ट आदेश नाहीत. त्यामुळे चारही बाजूंनी शिक्षक वर्गात असुरक्षिततेची भावना आहे. एकंदरीत कोरोना योद्धा म्हणून रामभरोसे सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना शासन स्तरावरून ठोस विश्वास देण्याची गरज आहे.


      शिक्षक आमदार नागो गाणार यांच्याकडून मागणी

       शासनाने कोरोना काळात शिक्षकांना कामाला जुंपले खरे मात्र या शिक्षकांच्या जीविताचे संरक्षण करणारी कोणतीच व्यवस्था उपलब्ध नाही. ही जबाबदारी पार पाडताना राज्यातील सुमारे २१२ पेक्षा अधिक शिक्षक मृत्युमुखी पडले आहेत. तर काही मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना शासन निर्णयानुसार ५० लाखांचे विमा कवच, सानुग्रह अनुदान किंवा वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती  केलेली नाही. काही शिक्षकांचे प्रस्ताव प्रलंबित तर काहींचे तांत्रिक बाबी पुढे करून नाकारले जात आहेत. ही अत्यंत खेदाची बाब आहे. कोरोना संबंधी जबाबदारी पार पाडताना मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडून शासनाने अमानवीय कृत्य केले आहे. याबद्दल शासन व प्रशासनाचा निषेध करत असल्याचे पत्र शिक्षक आमदार नागो पुंडलिक गाणार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री व सचिव यांना पाठवले आहे.

   मृत्युमुखी पडलेल्या  शिक्षकांच्या कुटुंबियांना ५० लाखांचे विमा कवच /सानुग्रह अनुदान, वैद्यकीय खर्च, व एका नातेवाईकास अनुकंपा खाली नियुक्ती देण्याची विनंतीही शेवटी गाणार यांनी केली आहे.No comments:

Post a Comment