जाळलेली झाडे वाहनधारकांसाठी ठरताहेत कर्दनकाळ, वादळी वाऱ्यावेळी कोवाड ते कागणी मार्गावरही स्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

16 May 2021

जाळलेली झाडे वाहनधारकांसाठी ठरताहेत कर्दनकाळ, वादळी वाऱ्यावेळी कोवाड ते कागणी मार्गावरही स्थिती

कोवाड रस्त्यावरील जाळून कमकुवत केलेली ही झाडे वाहनधारकांसाठी जीवघेणी ठरत आहेत.

कालकुंद्री : सी एल  वृत्तसेवा 

       कोवाड- बेळगाव मार्गावरील कोवाड ते कागणी दरम्यान बुंधे जाळून हेतुपुरस्सर कमकुवत केलेली शेकडो झाडे सध्या सुरू असलेल्या वादळात वाहनधारक व प्रवाशांसाठी जीवघेणी ठरत आहेत. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.

     सामाजिक वनीकरण विभागामार्फत पंधरा वर्षापूर्वी कोवाड बेळगाव मार्गावरील कोवाड ते होसुर दरम्यान हजारो झाडे लावून ती जतन केली आहेत. तथापि गेल्या सात-आठ वर्षात निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाभूळ, आकेशा आदी जातीची उंच वाढलेली ही उपयुक्त झाडे  राजरोस जाळण्याचे प्रकार वाढले आहेत. जाळून कमकुवत झालेली झाडे वादळाने पडली की लगेच त्यांची विल्हेवाट लावली जाते. तर वर्षभर अनेक झाडे राजरोस कापूनही नेली जातात. अशी शेकडो झाडे जाळून वादळात जमीनदोस्त करण्यासाठी तयार आहेत.  कमकुवत झालेली ही झाडे सध्या सुरू असलेल्या तोक्ते चक्रीवादात वाहने व प्रवाशांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. 

       झाडे जाळण्याच्या या प्रकाराबाबत पर्यावरण प्रेमींनी अनेक वेळा आवाज उठवला असला तरी शासनाच्या बांधकाम, पोलीस, वन आदी विभागानी ही झाडे आपल्या अखत्यारीत येत नाहीत. असे सांगत हात झटकल्याचे समजते. त्यामुळे ही झाडे नेमकी कोणाच्या अखत्यारीत येतात असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. अन्य रस्त्यांवरील झाडांना लाल- पांढरे पट्टे मारून त्यांची गणती ठेवली जाते.  इथे मात्र तसे काहीच नाही. त्यामुळे झाडे जाळणारे व चोरट्यांचे फावले आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी झाडे जाळणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी व वादळ वारा प्रसंगी जीवित व वित्त हानी होणार नाही याची संबंधित विभागाने जबाबदारी घ्यावी. अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment