*खरोखरच....मरण इतकं स्वस्त झालंय का? विचार करायला लावणारी वेळ संजय पाटील,पत्रकार,कोवाड* - चंदगड लाईव्ह न्युज

16 May 2021

*खरोखरच....मरण इतकं स्वस्त झालंय का? विचार करायला लावणारी वेळ संजय पाटील,पत्रकार,कोवाड*


संजय पाटील, कोवाड
कोरोना  विषाणूने आपले संपूर्ण जग बदलून टाकले .अनेकांचे होत्याचे नव्हते झाले , जीवाला जीव देणारी माणसे अचानकच बघता बघता डोळ्यासमोरुन नाहीशी झाली . आयुष्यात एक रिकामेपण आले जे पुन्हा कधीही भरून न निघणारे होते . याच काळात माणुसकी नाहीशी होतांना पाहिली .जीवाच्या भितीने रक्ताच्या नात्यांना दुरावलेले पाहिले . त्याच काळात या रुग्णांना साथ होती ती प्रशासनाची,पोलिसांची अन सगळ्यात महत्वाचा घटक असलेल्या आरोग्य विभागाची....कोरोना कुणाचा बाप बघत नाही कि कुणाची आई ना भाऊ ना बहीण ना मुलगा ना मुलगी ना मित्रपरिवार,त्यामुळे नागरिकानो सावध व्हा अजूनही वेळ गेलेली नाही... पहिल्या दु : खद घटनेतून सावरत नाही , तोच दुसरा निरोप येतो अन् या दोन्ही घटनांच्या भावनांना वाट मोकळी होण्यापूर्वीच तिसऱ्यांदाही तशीच बातमी येते . वेळ आली की , प्रत्येकाला जगाचा निरोप घ्यावाच लागतो पण , एकाच कुटुंबातील तिघांना जीव सोडवा लागल्याची हृदयद्रावक घटना क्वचितच घडते . घरातील कर्त्या तीन तीन व्यक्तींच्या मृतदेहावर पीपीई किटच्या आधारे अग्नी दिल्यानंतर मनामध्ये एकच प्रश्न पडतो आहे तो म्हणजे *खरोखरच आजच्या परिस्थितीत मरण इतकं स्वस्त झालंय का ?*
 आज अनेक ठिकाणी निर्माण झालेल्या कोरोनाच्या साखळ्या अनेक घरातील कर्त्या व्यक्तींच्या मृत्यूने थांबत आहेत .या कठीण प्रसंगात प्रत्येक गावातील स्थानिक दक्षता कमिट्या  घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर विजेचे खांब आडवे टाकून प्रतिबंधित क्षेत्र असे बोर्ड लावण्यापलीकडे काही करताना दिसत नाहीत.अन ज्या कुटुंबानी आजवर गावातील अनेक कुटुंबाच्या अडीअचणीमध्ये धावून जाऊन त्या सोडविण्यासाठी मेहनत घेतल्या त्यांच्या नशिबी मात्र मानसिक आधार देण्याऐवजी अवहेलना सोसावी लागत आहे.अशा अनेक कुटुंबातील सदस्य उपचार घेत असताना तर गावातील नागरिकांच्या चर्चेना तर जणू काही ऊत येत होता की आज हा गंभीर आहे,आज याचा मृत्यू झाला....ही बाब खरी तर चिंतनीय आहे.आणि यावर सर्वानी विचार करण्याची आज गरज निर्माण झाली आहे.कारण आज ज्या कुटुंबावर ही सर्व परिस्थिती ओढवली आहे तशी परिस्थिती सद्यस्थितीत पहायला गेलं तर कोणावरही ओढावू शकते.त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही यापुढे तरी गावकऱ्यांकडून सगळे आपलेच बांधव आहेत असे समजून  वेळीच सावध होऊन कठीण प्रसंगाशी दोन हात करणाऱ्या प्रत्येक  कुटुंबांच्या ठामपणे पाठीशी राहुन दिवसागणिक लयास जात असलेली माणुसकी जिवंत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करायला हवा.ज्या कुटुंबियांकडून यापूर्वी केलेल्या मदतीची अशी परतफेड होताना  पाहून काळीज पिळवटून जात आहे.
*पर दुःख शीतल असतं, ते घरात घुसतं तेंव्हा त्याच गांभीर्य जाणवत*
याचीच प्रचिती सद्या जिल्ह्यातील अनेक कुटुंबाच्या बाबतीत पहायला मिळत आहे.आज या जीवघेण्या कोरोनाने कित्येक कुटुंबे उध्वस्त केली आहेत.कित्येक कुटुंबातील कुणाचा कुणाचा बाप, कुणाची आई,कुणाची बहीण तर कुणाचा मुलगा हिरावून नेला आहे.कोरोना बाधित व्यक्तींबरोबरच खरी कसोटी लागते आहे ती त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांची अनेक ठिकाणी असं पहायला मिळत आहे कि,जरी बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य हे निगेटिव्ह असून देखील त्यांच्याशी कोणीही संपर्क ठेवायला तयार नसतात.
निवडणुकीच्या वेळी घराचे उंबरे झिजवणारे लोक प्रतिनिधी मात्र या ठिकाणी एक फोन देखील करताना दिसत नसून कुठंतरी कमी पडताना दिसत आहेत.
या सर्व परिस्थितीत प्रशासन, आरोग्य विभाग कोरोना बाबतीतला सर्व्हे,त्यांचा आराखडा ,बाधित व्यक्तीला सेंटर पर्यंत पोच करण्याबरोबरच होम आयसोलेट असणाऱ्यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवत आहे.तालुक्यातील चंदगड सहित कानूर या ठिकाणावरील कोरोना सेंटर मध्ये तर वेळेचे बंधन न पाळता,जीवाची पर्वा न करता हे कोरोना योध्ये बधितांना कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.पण दुसऱ्या बाजूला वाढती रुग्ण संख्या त्यांच्या साठी डोकेदुखी ठरत असताना प्रत्येक ठिकाणचे नागरिक मात्र प्रशासनाने घालून दिलेल्या नियम पायदळी तुडवून अनावश्यक बाहेर फिरत आहेत.असे न करता सद्यस्थितीत प्रत्येक नागरिकाने हा विषय स्वतः गांभीर्याने घेऊन  प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.एक गोष्ट लक्ष्यात घ्यायला हवी आज खाजगी दवाखान्यातील होणारी लूट, उपचाराचे खर्च सर्वसामान्याना परवडणारे नाहीत त्यावर एकच उपाय तो म्हणचे स्वतः ची  व कुटुंबाची सुरक्षितता या सर्व परिस्थितीत नागरिक,स्थानिक कमिट्या यांनी आपापली जबाबदारी ओळखून एकमेकांची सांगड घालून काम केले तरच कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडायला मदत मिळणार आहे.अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही.


No comments:

Post a Comment