'गावठी कोंबडा भाजून कापून' मिळतोय, कुदनूर येथील शहाजी ओपन पोल्ट्रीत गावरान कोंबडा, कोंबडी व अंडी उपलब्ध - चंदगड लाईव्ह न्युज

21 September 2025

'गावठी कोंबडा भाजून कापून' मिळतोय, कुदनूर येथील शहाजी ओपन पोल्ट्रीत गावरान कोंबडा, कोंबडी व अंडी उपलब्ध



कुदनूर : सी एल वृत्तसेवा 

   कुदनूर, ता. चंदगड येथील तरुण सुनील शहाजी मुतकेकर यांनी गावरान कोंबड्यांचा ओपन पोल्ट्री फॉर्म सुरू केला आहे. गावठी कोंबडा कोंबड्यांचा अशा प्रकारचा हा तालुक्यातील पहिलाच प्रयोग असल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभरापूर्वी सुरू केलेल्या या पोल्ट्रीत सध्या गावठी कोंबडे व कोंबड्या असे १००० पक्षी आहेत. येथील अंडी व पक्षांना परिसरातून मागणी वाढत आहे.

    सुनील मुतकेकर यांनी नोकरीच्या मागे न धावता आपल्या शेतातील सुमारे अर्धा एकर परिसरात कोंबड्यांचा खुला खुराडा सुरू केला आहे. पिकांना मिळणारा बेभरवशाचा हमीभाव, रोगांना बळी पडणारी पिके, मजुरांची कमतरता, मजूर व खतांचे गगनाला भिडलेले दर, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त ही शेतीची स्थिती पाहून त्यांनी कुदनूर गावालगत राजगोळी मार्गावरील त्याच शेतात हा नाविन्यपूर्ण उद्योग व्यवसाय सुरू केला आहे.

   सध्या अनेक डॉक्टर विविध प्रकारच्या रुग्णांना गावठी अंड्यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. पण अशी अंडी मिळणे दुरापास्त झाले आहे. या ग्राहकांना शहाजी पोल्ट्री फार्म मधून गावठी अंडी खात्रीशीर व सहजपणे मिळू लागली आहेत. येथील सर्व कोंबड्यांना रोज काही प्रमाणात गुळ व कडुलिंबाचा पाला खाद्य म्हणून दिला जातो. यामुळे या कोंबड्यांपासून मिळणारी अंडी अधिक सकस व औषधयुक्त बनवण्यास मदत होते. याशिवाय खवय्यांसाठी कोंबडे किंवा कोंबड्या उपलब्ध आहेत. अशा प्रकारची खुली किंवा बंदिस्त पोल्ट्री चालवण्याची इच्छा असलेल्या तरुण-तरुणींना व्यवसायासाठी होलसेल दरात पक्षी उपलब्ध करून दिले जात आहे. याशिवाय गावठी कोंबडा खवय्यांना पोल्ट्री फार्म शेजारी तळगुळी रोडवर गावठी कोंबडा भाजून व तो कापून देण्याची  सुविधा सुरू असल्याचे सुनील यांनी सांगितले. हा सुद्धा तालुक्यातील पहिलाच प्रयोग ठरला आहे.

  एकंदरीत विविध प्रकारच्या अनेक लसीकरणातून तयार झालेली इंग्लिश कोंबड्यांची अंडी व चिकन खायला घाबरणाऱ्या खवय्यांना नैसर्गिक वातावरणात कोणत्याही प्रकारचे लसीकरण न झालेल्या गावरान कोंबड्यांचे चिकन व अंडी खात्रीशीर मिळू लागल्याने खवय्यांचे पाय आपोआप शहाजी पोल्ट्री फार्म कडे वळू लागले आहेत. गावरान पक्षी अंडी व चिकन  इत्यादी मागणीसाठी 8888546022 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन सुनील मुतकेकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment