नागनवाडी : सी एल वृत्तसेवा
अडकूर भागातील शेतकरी सध्या मोठ्या चिंतेत आहेत. या भागात नगदी पीक असलेल्या ऊसावर मोठ्या प्रमाणात तांबेरा आणि माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सततचे ढगाळ वातावरण व अधून मधून होणारा रिमझिम पाऊस या किडीसाठी पोषक ठरत आहे. ८६०३२ या बियाण्यावर फार मोठ्या प्रमाणात माव्याचा शिरकाव झाला आहे. या वाणामध्ये गोडीचे प्रमाण जास्त असते त्यामुळे सर्वाधिक फटका या वाणाला बसताना दिसत आहे. लोकरी मावा ही कीड उसाच्या पानाच्या खालील बाजूस समूहाने दिसून येते. पांढरट रंगाची असल्यामुळे तिला लोकरी मावा या शब्दांनी ओळखले जाते. वारा मुंग्या व कीडग्रस्त बियाणा मार्फत तिचा वेगाने प्रसार होतो. ही कीड पानांमधील रस शोषून घेते त्यामुळे त्याची पाने पिवळी काळी पडून निस्तेज होतात. यावर काळी बुरशीची वाढ झाल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते परिणामी उसाची वाढ खुंटल्याने ऊस उत्पादन व वजनात मोठ्या प्रमाणात घट होते. मागील महिन्यातील वादळी पाऊस वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा ऊस आडवा पडला आहे. त्यामुळे उसात शिरून तांबेरा व माव्यावर औषधाची फवारणी करणे शेतकऱ्यां समोर आव्हान बनले आहे. एकंदरीत हवामानाचा फटका सतत चार महिने पाऊस त्याचबरोबर किडीचा प्रादुर्भाव तांबेरा यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. पिक वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. तालुक्यातील काही कारखान्यांनी उत्पादक शेतकऱ्यांना ड्रोन फवारणी यंत्र उपलब्ध करून दिले जात आहे. रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करून लोकरी मावा नियंत्रणासाठी उपाय योजले जात आहेत. हीच स्थिती चंदगड तालुक्यातील सर्व भागात दिसून येत आहे.

No comments:
Post a Comment