कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या नातेवाईकांना ५० लाखांचे सानुग्रह अनुदान तात्काळ मिळावे, प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

19 May 2021

कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या नातेवाईकांना ५० लाखांचे सानुग्रह अनुदान तात्काळ मिळावे, प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांची मागणी

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

         कोविड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांना १९ मे २०२० च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने ५० लाख रुपयांचे विमा कवच/ सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. सोलापूर जिल्ह्यात अशाप्रकारे मृत्यू झालेल्या शिक्षकांचे सानुग्रह अनुदान मागणी प्रस्ताव मागवले होते. आता १४ मे २०२१ रोजी च्या नव्या शासन निर्णयानुसार याला मुदत वाढ देण्यात आली आहे. या निर्णयास अनुसरून असे प्रस्ताव आता दि. ३० जून २०२१ पर्यंत सादर करण्याचे आदेश सोलापूर जिप. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी काढल्यामुळे कोरोना ने मयत झालेल्या शिक्षकांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.  तथापि कोल्हापूर जिल्ह्यात याबाबत अजूनही संभ्रमावस्थाच आहे. ही संभ्रमावस्था दूर होऊन स्पष्ट आदेश देण्यात यावेत अशी मागणी जिल्ह्यात कोविड ड्युटीवर असलेल्या प्राथमिक, माध्यमिक आदी शिक्षकांनी केली आहे. यापूर्वी दाखल केलेले प्रस्ताव अनेक त्रुटी दाखवून परत पाठवले जात आहेत. यामुळे शिक्षकांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप होत आहे. कोरोना चे राष्ट्रीय कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान तात्काळ मिळण्यात सुलभता यावी यासाठी जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी हालचाली कराव्यात अशी मागणीही शिक्षक वर्गातून होत आहे.



No comments:

Post a Comment