उत्साळी येथे अर्सेनिक अल्बम गोळयांचे वाटप ग्रामस्थांना करताना सरपंच सौ. माधुरी सावंत -भोसले. |
एस. के. पाटील / अडकूर - सी. एल. वृत्तसेवा
सध्या चंदगड तालूक्यातील अनेक गावात कोरोनाचा धुमाकुळ चालू असला तरीही अडकूर पासून चार कि. मी. अंतरावर असणाऱ्या उत्साळी गावाने मात्र योग्य नियोजन करून गावात आता ४६० मुंबई - पुणेकर येऊनही केवळ दोनच रुग्ण पॉझिटीव्ह निघाले. याकामी ॲक्टिव्ह महिला सरपंच सौ. माधुरी संतोष सावंत -भोसले यांची नेत्रदिपक कामगिरी महत्वाची ठरली आहे.
१९९३ साली स्थापन झालेल्या उत्साळीची लोकसंख्या १हजारांच्या वर आहे. सौं. माधुरी सावंत -भोसले यांची २०१८ साली बिनविरोध थेट सरपंच म्हणून सूत्रे हाती घेतली. यानंतर आलेल्या महापूराला गावासोबत धैर्याने सामना केला. आता तर सलग दोन वर्ष कोरोनाचे थैमान चालू असताना व गावची बाजारपेठ असणाऱ्या अडकूरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण असतानाही गावाला सुरक्षित ठेवले आहे. विशेष म्हणजे तब्बल ४६० मुंबईं- पुणेकर रेड झोनमधून गावात आले असले तरी त्या सर्वांची तपासणी करून विलगीकरण कक्षात व्यवस्थितरित्या ठेवल्याने कोरोना सुद्धा उत्साळीला घाबरला.याची दखल घेत अगदी जिल्हा पोलिस प्रमूख, पोलिस उपअधिक्षक, तहसिलदार, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी, सभापती, गावचे पालक अधिकारी श्री. सावळगी आदिनी गावाला भेट दिली.
या सर्वांनी येथील ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, ग्रामस्थांचे, आशा, अंगणवाडी सेविकांचे, शिक्षक, कोरोना दक्षता समिती या सर्वांचे कोरोना संदर्भात केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले आहे. कोरोना काळात गावात सॅनिटायझर फवारणी, गावची स्वच्छता, आयुर्वेदिक काढा वाटप, अर्सेनिक अलबम गोळ्या, मास्क, सॅनिटायझर वाटप ग्रामपंचायत करत आहे.
याबरोबरच ध्वनीक्षेपकावरून कोरोना संदर्भात जनजागृती केली जात आहे. डॉ. डी. सोमजाळ, डॉ. रणधिर देसाई यानी वेळोवेळी आरोग्य सुविधेची मदत केली आहे. लॉक डाऊन काळात गावातच अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून दिली. याचबरोबर अंगणवाडी व प्राथमिक मुलांसाठी विविध कार्यक्रम आयोजन, हळदी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलामध्ये जनजागृती केली आहे. शेतकरी मेळावे, आरोग्य शिबिरे घेऊन गावात आरोग्यदायी वातावरण निर्माण केले आहे. याबरोबरच अडकूर ते उत्साळी रस्ता ७१ लाख मंजूर करून घेऊन तो पूर्ण केला आहे. गावाअंतर्गत १५ लाखांचा रस्ता पूर्ण केला आहे. तर आता आमदार राजेश पाटील यानी युद्धा १५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. तसेच १४ व्या वित्य आयोग व ग्रामनिधीतून गटारे, ग्राम पंचायत पायऱ्या, अंगणवाडी, शाळा साहित्य वाटप केले असल्याने सरपंच सौ. माधुरी सावंत भोसले या केवळ ॲक्टिंग नाही तर ॲक्टिव्ह सरपंच बनल्या आहेत. गावची कामगिरी पाहता उत्साळी ग्रामपंचायत शासनाने जाहिर केलेल्या कोरोणा मुक्ती पुरस्कारासाठी पात्र होवू शकते.
No comments:
Post a Comment