सी. एल. न्यूज इफेक्ट - बंधाऱ्यात अडकलेला कचरा पाटबंधारे विभागाने काढला - चंदगड लाईव्ह न्युज

27 June 2021

सी. एल. न्यूज इफेक्ट - बंधाऱ्यात अडकलेला कचरा पाटबंधारे विभागाने काढला

कोवाड येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात अडकलेला कचरा जेसीबीच्या साह्याने काढण्यात आला.

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा 

         कोवाड  (ता. चंदगड) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात कचरा अडकला होता. ताम्रपर्णी नदीतील पाण्याच्या विसर्गाला मोठा अडथळा ठरणाऱ्या कचऱ्याबाबत 'चंदगड लाईव्ह न्युज चॅनेल' ने 'कोवाड बंधाऱ्यातील कचरा काढण्यास मुहूर्त कधी मिळणार?' या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती. याची तात्काळ दखल घेत पाटबंधारे खात्याचे कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी तुषार पवार (चंदगड उपविभाग) यांनी यंत्रणा राबवून बंधारा खुला केला. 

       बंधाऱ्यातील कचरा साफ न केल्यास महापुराचा धोका अनेकपटीने वाढू शकतो. होणाऱ्या संभाव्य नुकसानीमुळे धास्तावलेल्या नदीकाठच्या गावातील नागरिकांची कचरा साफ करण्याची मागणी होती. बातमी प्रसिद्ध होताच पाटबंधारे विभागाने जेसीबी यंत्राच्या साह्याने कचरा काढून टाकला व बंधार्‍याने मोकळा श्वास घेतला. 
कचरा काढल्यानंतर खुला झालेला कोवाड बंधारा.
           याकामी विभागाचे वरिष्ठ लिपिक सुहास रेडेकर, कालवा निरीक्षक वसंत भोगण व सचिन गावडे आदींनी परिश्रम घेतले. कोवाड बंधाऱ्याच्या खाली असलेल्या दुंडगे आणि कामेवाडी बंधाऱ्यात अडकलेली लाकडे व कचरा दोनच दिवसात काढून टाकणार असल्याची माहिती तुषार पवार यांनी दिली. पाटबंधारे विभागाच्या कार्यतत्परतेबद्दल नदीकाठच्या गावांतून समाधान व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment