.....आणि झाडाखाली भरली शाळा, गाव तेथे भागशाळा, चंदगड तालुक्यातील उपक्रम, काय आहे उपक्रम वाचा...... - चंदगड लाईव्ह न्युज

08 August 2021

.....आणि झाडाखाली भरली शाळा, गाव तेथे भागशाळा, चंदगड तालुक्यातील उपक्रम, काय आहे उपक्रम वाचा......

झाडाखाली अशी शाळेत शिकविताना शिक्षक.

माणगाव (राजेंद्र शिवणगेकर) / सी. एल. वृत्तसेवा

            कोरोना सारख्या महामारीने गेली दिड दोन वर्षे शाळा बंद आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाच्या नियमांनुसार शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाची सुरुवात केली. पण चंदगड सारख्या दुर्गम भागात हा प्रयोग पुरता फसला. कारण बऱ्याच गावात मोबाईल रेंज नाही तर काही मुलांकडे स्मार्टफोन नाहीत. तर लॉक डाऊनमध्ये रोजगार गेल्यामुळे पालकांना रिचार्ज मारायला पैसे मिळत नाहीत. त्यामुळे चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूलने उत्स्फूर्तपणे भाग शाळा सुरू करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्याला सुरुवात केली आहे.

           नुकताच शासनाने कोरोना मुक्त गावात शाळा सुरू करण्याची परवानगी दिली पण चंदगड सारख्या तालुक्याच्या ठिकाणी दररोज कोव्हीडचे रूग्ण सापडत आहेत. त्यातच तालुक्यातील सर्वात मोठे  दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये क्वांरटाईन कोव्हीड सेंटर असल्यामुळे शाळा सुरू करण्यात अनेक अडचणी येत आहेत. दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाची सोय असल्यामुळे परिसारातील पंधरा ते वीस गावातील मुले येथे शिकण्यासाठी येतात. लॉक डाऊनमुळे बससेवा बंद आहेत.

           मुलांचे शैक्षणिक नुकसान नुकसान होऊ नये म्हणून दि न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य आर. आर. पाटील यांनी परिसरातील गावातील पालकांशी चर्चा करून गावातच मंदिर किंवा झाडाखाली  शाळा भरविण्याची कल्पना सांगितली .पालकांनी सुद्धा सर्व सहकार्य केले. वेळापत्रक बनवून दररोज दोन शिक्षक गावामध्ये जाऊन अध्यापन करू लागले.पालकांनी खुश होऊन शिक्षकांसाठी चहा नाष्टयाची सोय केली. मुले सुध्दा या झाडाखालच्या निसर्गशाळेत, मंदीरातल्या शाळेत रमू लागली. कोळींद्रे, नागवे, सुळये, शिरगाव, काजिर्णे, हिंडगाव, म्हाळूंगे इ. गावात हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला.

         या भागशाळेसाठी टी. व्ही. खंदाळे, बी. आर. चिगरे, सूरज तुपारे, एम. व्ही. कानूरकर, जे. जी. पाटील, एस. जे. शिंदे, डी. जी. पाटील, व्ही. के. गावडे, एस. जी. साबळे यांनी परिश्रम घेतले. दि न्यू इंग्लिश स्कूलच्या या उपक्रमाची पंचायत समिती शिक्षण विभागाचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे  यांनी दखल घेऊन कौतुक केले.

No comments:

Post a Comment