ओढे-नाले यातील अतिक्रमणे खुली करा, शेती व पिके नुकसानीचे पंचनामे सरसकट करा - पालक मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

09 August 2021

ओढे-नाले यातील अतिक्रमणे खुली करा, शेती व पिके नुकसानीचे पंचनामे सरसकट करा - पालक मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील

चंदगड तालुक्यात अतिवृष्टी महापूरामुळे बाधित क्षेत्राच्या पहाणी नंतर कोवाड येथील आढावा बैठकीत आवाहन व अधिकाऱ्यांना आदेश

कोवाड (ता. चंदगड) येथील आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री सतेज पाटील.

कोवाड/ कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
ओढे-नाले यात सर्व ठिकाणी अतिक्रमणे झाल्यामुळे पाण्याला वाट मिळत नाही. त्यामुळे शेतीची अधिक नुकसान होत आहे. असे अडथळे पाहून ते खुले करावे. यासाठी ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, कृषी विभाग यांनी नियोजन करावे याला महाराष्ट्र शासन सहकार्य करेल. असे आवाहन महाराष्ट्राचे गृहनिर्माण व माहिती- तंत्रज्ञान राज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी कोवाड तालुका चंदगड येथे केले. 


          रविवार 8 ऑगस्ट रोजी भुदरगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यांत पूरग्रस्त भागाचा धावता दौरा करून चंदगड तालुक्यातील दुंडगे बंधाऱ्याच्या पाहणी नंतर कोवाड येथे सर्व शासकीय विभागांच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत चंदगड चे आमदार राजेश पाटील उपस्थित होते.
   आढावा बैठकीच्या सुरुवातीस मार्गदर्शन करताना नुकसानग्रस्त शेतीचे सरसकट पंचनामे करावेत. यात भात ऊस असा दुजाभाव करू नये असे आदेश दिले. पुरामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना मदत करताना वेगळ्या चूल किंवा गॅस कनेक्शन वर स्वतंत्र स्वयंपाक होत असेल तरच कुटुंब स्वतंत्र धरावे. महापुरात दरवर्षी बुडणाऱ्या घरांचा सर्वे करून तहसीलदार व बीडीओनी अन्यत्र पुनर्वसन करण्यासाठी आराखडा तयार करावा. दरवर्षी 30 टक्के प्रमाणे घरांचे बांधकाम शासनामार्फत केले जाईल. 
          तथापि पुनर्वसन मधील घर मिळणाऱ्या कुटुंबाला बुडणाऱ्या घरावरील हक्क सोडावा लागेल, असेही स्पष्ट केले. हा आराखडा 20 सप्टेंबर 2021 पर्यंत तयार करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. ज्या गावात घरे बांधण्यासाठी जागा कमी असेल अशा ठिकाणी तीन मजली घरे बांधण्याचा प्रस्ताव असल्याचेही त्यांनी सांगितले. पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा दरडी कोसळून रस्ते घरे आदींचे नुकसान होऊ नये यासाठी प्रत्येक तालुक्यात पाच जणांची तज्ञ कमिटी नियुक्त करून अशा ठिकाणांचा आढावा घेतला जाईल. दरड कोसळण्याची शक्यता असेल तर आधीच स्थलांतर करणे यामुळे शक्य होईल. यावेळी कोवाड येथील लक्ष्मी नगर रहिवाशांनी घरांवर दरडी कोसळण्याची शक्यता असल्यामुळे संरक्षक भिंतींची मागणी केली. याकामी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश मंत्रिमहोदयांनी दिले. 
         याशिवाय तालुक्यातील राजगोळी खुर्द, तळगुळी, कुदनुर, कागणी, घुलेवाडी, कडलगे गावानजीकच्या मोऱ्यांची उंची वाढवणे, तसेच दुंडगे बंधारा काढून त्याठिकाणी उंच पूल बांधणे, दाटे गावानजीकच्या रस्त्याची उंची पाच फुटाने वाढवणे आदी कामांची निवेदने सादर करण्यात आली. ही सर्व कामे नजीकच्या काळात प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासन पालक मंत्री पाटील यांनी दिले. आढावा बैठकीच्या सुरुवातीस प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी गेल्या तीन वर्षात वारंवार पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांचा आढावा सांगितला. आमदार राजेश पाटील यांनी तालुक्‍यात अनेक पाटबंधारे प्रकल्प आहेत ते पावसाळ्यात भरल्यानंतर होणारी परिस्थिती पूरस्थिती टाळण्यासाठी पाटबंधारे खात्याचे चांगले नियोजन हवे, याचबरोबर विस्थापितांना घरकुले देताना गावठाणात जागा अपुरी पडते ती वाढवण्यासाठी प्रस्ताव तयार करा. 
         कोरोना काळात तालुक्यात आरोग्याच्या सुविधा अपुऱ्या असूनही आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक यांनी चांगले कार्य केल्यामुळे मृत्यू दर कमी असल्याचे गौरवोद्गार काढले.
        याप्रसंगी संग्रामसिंह नलवडे, गोपाळराव पाटील, विजय देवणे, सुनील शिंत्रे, संभाजीराव देसाई, अशोकराव देसाई, एम जे पाटील, विद्याधर गुरबे, जे बी पाटील, अनिता भोगण, सभापती ॲड. अनंत कांबळे, जि प. सदस्य कल्लापा भोगण, विद्या पाटील, सचिन बल्लाळ, अरुण सुतार, सर्व पंस. सदस्य, परिसरातील गावांचे सरपंच व पदाधिकारी, तहसीलदार विनोद रणवरे, आरोग्य अधिकारी डॉक्टर आर के खोत, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, गट शिक्षणाधिकारी सौ सुमन सुभेदार यांच्यासह तालुक्यातील महसूल, आरोग्य, शिक्षण, वन, कृषी, वीज वितरण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment