कामचुकार अधिकाऱ्यांना धरले धारेवर, पं.स.मासिक बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

03 September 2021

कामचुकार अधिकाऱ्यांना धरले धारेवर, पं.स.मासिक बैठक

 


चंदगड / प्रतिनिधी
तालुक्यातील  काहीं ग्रामसेवक मुख्यालयात कधीच नसतात.बैठकीच्या  नावाखाली लोकांची दिशाभूल करीत असतात. ग्रामसेवका अभावी लोकांची  अनेक कामे रखडली आहेत.  बुजवडे येथील ग्रामसेवकाने घरकूल बाबत उत्कृष्ट कार्य केले आहे.या ग्रामसेवकाचा आदर्श कामचुकार ग्रामसेवकांनी घ्यावा व ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनीही  कामचुकार ग्रामसेवकावर अंकुश ठेवावा, नाहीतर दोघांच्यावरही कारवाई करणे भाग पडेल, अशी सूचना बबनराव देसाई यांनी पं स मासिक बैठकीत केली.अध्यक्षस्थानी सभापती ॲड अनंत कांबळे  होते. प्रास्तविक गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी केले. अहवाल वाचन संजय चंदगडकर  यांनी केले. यावेळी कृषी अधिकारी संतोष जाधव यांच्या बदलीनिमित्त सत्कार करण्यात आला
पशुसंवर्धन विभागाच्या  अनागोंदी कारभारामळे अनेक जनावरांचा मृत्यू होत आहे. पशुवैद्यकीय अधिकारी जागेवर नसल्याने कंपाउंडर  जनावरांची तपासणी करताना दिसत आहेत. त्यामुळे योग्य उपचाराअभावी जनावरवारांचा मृत्यू होत आहे. याला जबाबदार पशुसंवर्धन विभाग आहे. या विभागाच्या अलिकडे तक्रारी वाढल्या आहेत.  जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा असा ठराव करण्यात आला. 
      पशुसंवर्धन विभागातील कंपाऊंडर डॉक्टर झाले आहेत. डॉक्टरकीचे पूर्ण ज्ञान नसतांना जनावरांची तपासणी केली जाते. त्यामुळे योग्य उपचार होत नाहीत. यापुढे कंपाउंडर तपासणी करताना आढळले तर पहिल्यांदा  तेथील अधिकारी निलंबित होईल असा इशारा सदस्य दयानंद काणेकर यांनी  पशुसंवर्धन विभागाला दिला. झालेल्या वादळी चर्चेनंतर या विभागाकडे तब्बल १३ रिक्त पदे असल्याची माहिती देण्यात आली.  पशुवैद्यकीय अधिकारी व इतर पदे तात्काळ भरा  अन्यथा झेडपी समोर आंदोलन करावे लागेल असा इशारा सदस्यांनी दिला. चंदगड आगाराच्या गाड्यामध्ये प्रवासी बसत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील फेऱ्या बंद केल्या आहेत. सध्या एसटी डेपो तोट्यात आहे असे आगार प्रमुखांनी सांगताच काणेकर भडकले. वडाप जोरात चालते, आणि एसटीलाच दिवस का वाईट आलेत? तुमच्या नियोजनाचा अभाव आहे. रिकामी गाडी फिरली तर तर तुमच्या खिशातील पैसा संपतो का?  गाड्या सर्व मार्गावर चालू करा, काही मदत लागलीच तर सेवाभावी संस्था, बँका देणग्या देतील.  असे काणेकर यांनी सांगितल्यानंतर डेपो व्यवस्थापकांनी दुजोरा दिला. कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा अद्यापही बंद आहेत. इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा शासन निर्णय सात जुलै २०२१ प्रमाणे सुरू आहेत. इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन ऑफलाईन अध्यापन सुरू आहे. माझा टीव्ही माझी शाळा  टीव्हीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मालिका सुरू करण्यात आले आहे. एन एम  एम एस परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून चंदगड तालुक्यातील १०३ विद्यार्थी गुणवत्ताधारक झाले असल्याची माहिती शिक्षणविस्तार अधिकारी सुमन सुभेदार यांनी देऊन शिक्षण विभागाकडे अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न अपुरे पडत असल्याचे सांगितले.
एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत इमारत बांधकामाकरिता प्रस्ताव पाठवले आहेत. त्यापैकी चार अंगणवाडीच्या प्रशासकीय इमारतीला मान्यता मिळाली आहे. यामध्ये मुरकुटेवाडी, कोवाड, जंगमहट्टी, ढोलगरवाडी गावांचा समावेश आहे. तर कानुर,  कानुर पैकी नांदूरे, धामापूर पैकी नांदुरे, महिपाळगड, हल्लारवाडी पैकी सदावरवाडी, हलकर्णी, सरोळी, कोवाड, कुदनुर या गावातील इमारतींच्या बांधकामाचा परवाना मिळाला आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नांदवडे करेकुंडी पाटणे या गावांचे काम प्रगतीत असल्याची माहिती  अभियंता एस. एस. सावळगी यांनी दिली.    अतिवृष्टी आणि महापुरामुळे तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. रस्त्यांची तात्काळ डागडुजी करावी तसेच चंदगड फाटा ते गुरुवारपेठ पर्यंतचा रस्त्याची  तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शेष फंडातील साहित्य पडून आहे ते तात्काळ वितरित करावे असे सूचित करण्यात आले. रमाई आवास विकास योजनेअंतर्गत ५६८ उद्दिष्ट पैकी ३८८ कामे पूर्ण झाल्याची माहिती अभियंता देशपांडे यांनी दिली. ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत सोनारवाडी ते शिवणगे,  आमरोळी ते मुगळी,  शिरोली फाटा ते अडकूर,  नागरदळे ते बुक्कीहाळ अश्या नऊ किलोमीटरच्या अंतरावर  ४५००  वृक्ष रोपांची लागवड केल्याचे वनक्षेत्रपाल एस. जे. नागवेकर यांनी सांगितले. तालुक्यात कोरोनाचे २३३१ रुग्ण आढळले आहेत. पैकी २२६३ रुग्ण बरे झाले आहेत. बरे होण्याची टक्केवारी ९७.१ टक्के इतकी आहे. आज अखेर   आरटीपीसीआर तपासणी केलेले २५५२८, स्वाब घेतलेले नमुने ४३७९२,   आरटीपीसीआर तपासणी २५५२८, सुपर स्प्रेडर तपासणी केलेले  १४७२२, यापैकी पॉझिटिव्ह ६१७ जण असल्याची माहिती  तालुकाआरोग्य अधिकारी डॉक्टर आर. के. खोत  यांनी दिली.  पंधराव्या वित्त आयोगातुन बंधीत निधी ८० लाख ४१ हजार, ८१७ तर अबंधीत निधीतून ८४ लाख ८६ हजार, ९२ इतका निधी मंजूर झाल्याची माहिती संजय चंदगडकर यांनी दिली.  मंजूर निधीचे वाटप विकास कामांसाठी सर्व सदस्यांना समान वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत उपसभापती मनीषा शिवणगेकर, विठाई मुरकुटे, रूपा खांडेकर, नंदिनी पाटील, यांनीही भाग घेतला. आभार बबनराव देसाई यांनी मानले. No comments:

Post a Comment