स्वामी विवेकानंद विद्यालयात पर्यावरणपूरक गणपती विसर्जन, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

14 September 2021

स्वामी विवेकानंद विद्यालयात पर्यावरणपूरक गणपती विसर्जन, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांची उपस्थिती

 

स्वामी विवेकानंद विद्यालय गुडेवाडी येथे पर्यावरण पुरक गणेश विसर्जन करताना चंद्रकांत बोडरे

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुक्यातील स्वामी विवेकानंद विद्यालय गुडेवाडी (ता. चंदगड) येथे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देऊन जनजागृती केली जात आहे. या उपक्रमाची दखल पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने घेतली आहे. गावातील सुंदर तलाव, नदी, नाले वाचविण्यासाठी पालकांचे सहकार्य वाढत आहे. चंदगड तालुका निसर्गरम्य असून या तालुक्यामध्ये अनेक कृत्रिम तलाव आहेत. गेल्या काही वर्षामध्ये घरगुती आणि सार्वजनिक गणपती विसर्जनामुळे जलस्रोत दूषित होत आहेत. लोकांच्या श्रद्धेला धक्का न लावता पर्यावरणपूरक विसर्जनाचा संदेश या शाळेतील विद्यार्थी देत आहेत. यावर्षी शाळेच्या जलकुंडात गणेश मूर्तिचे विसर्जन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा केले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या विसर्जनातून चॉकपिट तयार होते. याचा उपयोग शाळा वर्षभर खो- खो, कब्बडी मैदान आखण्यासाठी करते. विसर्जनामधून तयार झालेले खत गावातील शेतकरी शेतीसाठी वापरतात. पक्षी घरटे बांधण्यासाठी काथ्याचा वापर करतात.

      यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले. या पुढील काळात अमोनियम बायकार्बोनेट पंचायत समिती वित्त आराखड्यात  ग्रामपंचायतला उपलब्ध करून लोकचळवळ उभी करण्याचा  मानस व्यक्त केला. कायमस्वरूपी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केलेले यु. एस. कपिलेश्वरी, निंगाप्पा आवडण, विध्यार्थी निवृत्ती वरपे यांचा सत्कार करण्यात आला. आयोजक एल. पी. पाटील यांनी विद्यालयातील चार निराधार मुलांचा शैक्षणिक खर्च उचलत निराधारांचे होऊ बाप्पा हा संदेश दिला.

        या कार्यक्रमाला पंचायत समिती चंदगडचे श्री. ठोंबरे, किरण पाटील, बसर्गे शाळेचे शाहू पाटील, शाळा समितीचे अध्यक्ष निंगाप्पा आवडण, मुख्याध्यापक जी. व्ही. गावडे, मुख्या एन. एस. पाटील, एस. बी. पाटील, प्रकाश नाईक, शशिकांत गावडे, पुंडलिक पाटील माजी विध्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

        दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव ही शैक्षणिक संस्था नेहमीच समाजातील वाईट रूढी परंपरा, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जनजागृती करण्याचे काम करत आहे. या उपक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अॅड राजाभाऊ पाटील, सचिव प्रा. विक्रम पाटील, सहसचिव डॉ. दिपक देसाई, प्रा एम. बी. निर्मळकर,समता प्रतिष्ठाणचे डॉ. प्रदिप देवण यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment