चंदगड तालुक्यात घरगुती व सार्वजनिक गणपतींचे भक्तीमय वातावरणात आगमन - चंदगड लाईव्ह न्युज

10 September 2021

चंदगड तालुक्यात घरगुती व सार्वजनिक गणपतींचे भक्तीमय वातावरणात आगमन

 

घरगुती गणपतीचे भक्तीमय वातावरणात आगमन

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
`गणपती बाप्पा मोरया` टाळ मृदंग व ढोल, ताशांच्या गजरात तालुक्यात आज सर्वत्र सकाळपासून घरगुती व सार्वजनिक गणरायांचे भक्तीमय वातावरणात आगमन झाले. मात्र यावर्षी पुरामुळे अनेकांचे संसार उध्वस्थ झाल्याने अनेकांना गणेशमुर्ती पुजविण्यासाठी घरच नसल्याने मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव काहीसा सुखाचा तर काहीसा दु:खाचा असा ठरणार आहे. आज दिवसभर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू होता. कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. गणेशाच्या आगमनासोबत कोरोनाचे संकट दुर व्हावे अशीच प्रत्येक गणेशभक्तांने गणेशाकडे प्रार्थना केली आहे.
गेल्या महिनाभरापासून सार्वजनिक तर तीन-चार दिवसापासून घरगुती गणपतीसाठी मकर करण्यात अबालवृद्ध मग्न होते. ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहाने केला जात असल्याने याला जास्त महत्व आहे. गणेशमूर्ती नेण्यासाठी चंदगड येथील कुंभारवाड्यात लोकांनी एकच गर्दी केली होती. गणेशोत्सवासाठी वर्षभर बाहेरगावी असलेले चाकरमानी गणपतीला आवर्जून गावी येतात.  येथील कुंभारवाड्यातून आज सकाळपासून कोणी चालत, कोणी मोटरसायकलने,  कोणी स्वतःच्या वाहनातून मिळेल त्या सोयीने गणेशमूर्ती नेत होते. कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी बऱ्याच गावांनी जाणारी बसेस बंद असल्याने अनेकांची अडचण झाली. बरेच लोक एकत्र येऊन ग्रुपने खाजगी वाहन करुन गणेशमूर्ती नेत होते. काही गावामध्ये गावामध्येच गणेशमूर्ती मिळत असल्याने सुतारगल्ली व कुंभारवाड्यात आज दिवसभर गर्दी होती. गणपतीसाठी मकर करण्यासाठी रात्र जागवली गेली. विद्युत रोषणाई, हार, वेली, फुलदाण्या, गणेशाचे आसन, फेटा तोरणे, उपरणे, महावस्त्र, टोपी, झुरमुळ्या, कागदी पताका या गोष्टी मकराच्या सजावटीसाठी वापरल्या गेल्या आहेत. शाळकरी मुलांना सुट्टी असल्यामुळे तेही आज दिवसभर मकर करण्याच्या कामात दंग होते. घरगुती गणेशाच्या आगमनाची तयारी गेल्या दोन दिवसापासून तर गेले महिनाभर सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते मंडपाची तयारी करत होते. त्याला आज पूर्णत्व आले. सार्वजनिक गणेश मंडळे ढोल, ताशा, बेंजो लावून ट्रॅक्टर व अन्य वाहनावरुन मिरवणूकीने गणेशमूर्ती आणून प्रतिष्ठापणा केली. सार्वजनिक गणेश मंडळे अजूनही हलत्या देखाव्यासाठी कामात मग्न असल्याचे चित्र आहे. गणेशाच्या आगमनाने घराघरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. आजकाल सर्वच कामांना मूहूर्त बघितला जातो. त्याचप्रमाणे गपणतीही मुहुर्तावर नेण्यासाठी अनेकांची धडपड सुरु होती. गणरायाचे आगमन झाल्याहे सर्वत्र वातावरण गणेशमय झाले होते.



No comments:

Post a Comment