![]() |
कै. नारायण मुंगारे |
कालकुंद्री : (श्रीकांत पाटील) सी. एल. वृत्तसेवा
शिवनगे (ता. चंदगड) येथील नारायण सत्याप्पा मुंगारे यांचे ५ सप्टेंबर २०२१ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. पुरोगामी विचारसरणीचे माजी आमदार कै. नरसिंगराव भुजंगराव पाटील यांचे आदर्श व विचारांचे ते पाईक होते. आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी समाजकार्याचे व्रत जपले.
शिवणगे सारख्या पुरोगामी विचारसरणीच्या गावात ते लहानाचे मोठे झाले. घरच्या गरिबीमुळे आई-वडिलांच्या प्रेरणेने केवळ चौथीपर्यंत शिक्षण झाले. तथापि स्वतः शिक्षणप्रेमी असल्यामुळे त्यांनी आपल्या दोन भाऊ बहिणीसह आपल्या सहा मुलींचे उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या पाठबळामुळे यांचा एक भाऊ MSc Agri पूर्ण करून कृषी महाविद्यालयात प्राध्यापक झाले तर दुसरे भाऊ विवेकानंद शिक्षण संस्थेत कार्यरत होते. एक आदर्श पिता म्हणून त्यांनी आपल्या मुलींना उच्चशिक्षित करून स्वतःच्या पायावर उभे केले. आपल्या कृतीतून मुलींच्या शिक्षणाबद्दलची संवेदनशीलता दाखवून दिली. त्यांचे सर्व जावई सुद्धा उच्चशिक्षित आहेत. त्यांचे एक जावई हणमंत कृष्णा मुतकेकर त्यांच्या समाजसेवेचा वसा पुढे चालवत असून पंचवीस वर्षांपासून सासू-सासर्यांचा वृद्धापकाळातील आधार बनले आहेत.
सामाजिक बांधिलकी जपणारे नारायण मुंगारे शिवनगे व पंचक्रोशीत विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असायचे. गावातील कोणीही मयत झाल्यास अंत्यविधी कार्य त्यांच्याशिवाय पूर्ण होत नव्हते. या आगळ्या समाजकार्यासाठी त्यांना 'पद्मभूषण जे पी नाईक यांच्या स्मरणार्थ कै रामचंद्र महादेव माध्याळकर एज्युकेशन सोसायटी भादवणवाडी' यांच्या मार्फत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात सहा मुली, जावई, नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे.
शांत, संयमी, प्रेमळ आणि कुटुंबासह गावचा आधारवड ठरलेल्या कै नारायण मुंगारे यांच्या निधनाने गावच्या सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. त्यांना कुटुंब व ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!!
No comments:
Post a Comment