समाजातुन मिळणाऱ्या मदतीमुळेच ज्ञानमंदिरे समृद्ध होतात - सभापती कांबळे, इब्राहिमपूर शाळेस प्रिंटर देणगी - चंदगड लाईव्ह न्युज

27 October 2021

समाजातुन मिळणाऱ्या मदतीमुळेच ज्ञानमंदिरे समृद्ध होतात - सभापती कांबळे, इब्राहिमपूर शाळेस प्रिंटर देणगी

इब्राहिमपूर शाळेस प्रिंटर भेट कार्यक्रमात बोलताना देणगीदार बापूसाहेब गव्हाळे. व्यासपीठावर ॲड. अनंत कांबळे व इतर शिक्षक.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

       श्रीराम विद्यालय कोवाडचे सेवानिवृत्त उपप्राचार्य बापूसाहेब गव्हाळे यांनी इब्राहिमपुर केंद्र शाळेस देणगी स्वरूपात प्रिंटर भेट दिला. विनायक शिवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात पं. स. सभापती ॲड. अनंत कांबळे यांनी प्रिंटरचे उद्घाटन केले. 

     स्वागत मुख्याध्यापक उत्तम पाटील यांनी केले. यावेळी बोलताना सभापती म्हणाले,``पालक व समाजातून मिळणाऱ्या अशा छोट्या मोठ्या देणगीतूनच आपल्या बालकांना घडवणारी ज्ञान मंदिरे समृद्ध होतात. प्रत्येकाने आयुष्यात एक तरी वस्तू आपण किंवा आपली मुले शिकत असलेल्या शाळेसाठी दिली पाहिजे. गव्हाळे यांचा उपक्रम सर्वांसाठी अनुकरणीय आहे. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे, हायस्कूल मुख्याध्यापक सुरेश हरेर, सरपंच निळकंठ देसाई यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी  शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी चिन्मय गावडे व मयुरेश गावडे यांचे स्मृतिचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमास केंद्रप्रमुख मोहन नाईक,  तुकाराम हरेर, पुंडलिक कुंभार, विद्या वसावे, स्मिता मिसाळ, संजय कुंभार, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गजानन बैनवाड यांनी केले. आभार भाऊसाहेब पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment