कोवाड बंधाऱ्यातील बरग्यांचे काम रोखले, कोणी व का रोखले, वाचा....... - चंदगड लाईव्ह न्युज

27 October 2021

कोवाड बंधाऱ्यातील बरग्यांचे काम रोखले, कोणी व का रोखले, वाचा.......

कोवाड बंधाऱ्यातील बरग्यांचे काम रोखताना शिवसैनिक, व्यापारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        कोवाड (ता. चंदगड) येथील बंधाऱ्यात पाणी अडवण्यासाठी सुरू असलेले बरगे घालण्याचे काम आज शिवसेना, व्यापारी संघटना व ग्रामस्थांनी रोखले. पुरास कारणीभूत बंधारा व नवीन पूल दरम्यान साठलेली गाळ-माती काढल्याशिवाय बरगे बसवू देणार नाही. अशी भूमिका यावेळी घेण्यात आली.

प्रवाहाबरोबर येऊन पडलेली ही माती सध्या अडथळा ठरत आहे.
                कोवाड येथे २०१९ व यावर्षी २०२१ मध्ये आलेल्या प्रलयंकारी  महापुरामुळे बाजारपेठ व ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले होते. प्रवाहास अडथळा ठरत असल्याने महापूर येण्यास नदीकिनारी साठलेला गाळ (मळक) हे सुद्धा एक कारण आहे. पुर काळात भेट दिलेल्या तहसीलदार, प्रांत आदी अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींकडे किणी हद्दीच्या बाजूस नदीत साठलेली माती काढण्याची मागणी केली होती. त्यावेळी पाणी कमी होताच गाळ काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तथापि त्याची पूर्तता न झाल्यामुळे संतप्त पूरबाधित, शिवसैनिक व्यापारी बंधू व विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम बंद पाडले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अशोक मनवाडकर, शहर प्रमुख शिवानंद अंगडी, उपसरपंच पुंडलिक जाधव, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र व्हन्याळकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष जॉन लोबो, व्यापारी संघटना उपाध्यक्ष कल्लाप्पा वांद्रे, सुधीर पाटील, रणजीत भातकांडे, रामा बागीलगेकर, दीपक कोरी, दशरथ साळुंखे यांचेसह व्यापारी व विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

           याबाबत संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता; नदीतील गाळ, माती, वाळू काढणे हा धोरणात्मक निर्णय असून महसूल विभागाच्या आदेशाशिवाय आम्ही गाळ काढू शकत नाही. अन्यथा बेकायदेशीर उत्खनना बद्दल आमच्यावरच गुन्हे दाखल होतील. पण आदेश आल्यास आम्ही यंत्रणा राबवू शकतो असे सांगण्यात आले. 

         महापूर काळात अधिकारी व लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनानंतर महसूल व पाटबंधारे विभाग अंतर्गत याबाबत पत्रव्यवहार झाला आहे का? की पूर आल्यानंतर दरवर्षी आश्वासनेच मिळत राहणार? असा सवाल आंदोलकांनी केला आहे. महापूरास कारणीभूत ठरणारे असे अडथळे कमी न केल्यास महापुराची टांगती तलवार ग्रामस्थ व व्यापारी वर्गावर दरवर्षी कोसळणार हे मात्र नक्की.

1 comment:

Unknown said...

नेहमीचा येतो पावसाळा

Post a Comment