कोल्हापूर- कोवाड बस व्हाया कालकुंद्री दड्डी मार्गे न सोडल्यास आंदोलनाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

27 October 2021

कोल्हापूर- कोवाड बस व्हाया कालकुंद्री दड्डी मार्गे न सोडल्यास आंदोलनाचा इशाराकालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड आगाराची कोल्हापूर दड्डी मार्गे कोवाड मुक्काम ही बस गेल्या काही वर्षापासून सुरु आहे. सायंकाळी ५ वाजता कोल्हापूर मधून सुटते कोवाड मुक्काम करून सकाळी ६.१५ वाजता राजगोळी दडडी मार्गे कोल्हापूरला जाते. सध्या ही बस दड्डी, राजगोळी, कालकुंद्री मार्गे कोवाडला न येता गडहिंग्लज, नेसरी मार्गे सुरू आहे. यामुळे कागणी, कालकुंद्री, कुदनुर, तळगुळी, किटवाड, राजगोळी बुद्रुक, राजगोळी खुर्द, कामेवाडी, चेन्नेटी आदी १५ गावांतील कोल्हापूर कडे जाणाऱ्या प्रवाशांना ज्यादा तिकिटाचा आर्थिक भुर्दंड बसतो. तसेच शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. 

      दड्डी मार्गे येणारी ही बस बंद करण्यामागे दड्डी पुलाच्या नादुरुस्ती चे कारण पुढे केले जात होते. तथापि त्याचे पॅच वर्क काम पूर्ण झाले आहे. तरीही आगार प्रमुख व एसटीच्या अधिकाऱ्यांना तिकडून गाडी सोडायचीच नसेल तर गडहिंग्लज, नेसरी वरून कोवाड मुक्कामी येणारी ही बस कालकुंद्री, कुदनुर मार्गे राजगोळी खुर्द मुक्कामी ठेवावी. अशी मागणी होत आहे. याबाबत मार्गावरील ग्रामपंचायतींनी आगार प्रमुखांना लेखी निवेदने सादर केली आहेत‌. याप्रश्नी दोन दिवसात निर्णय न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा मार्गावरील ग्रामस्थ व प्रवासी संघटनेने दिला आहे.

            एसटीतील काही कर्मचारी आपल्या सोयीसाठी बस कोवाड मध्येच मुक्कामी राहील यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते. त्यामुळे एस टी बस ही 'प्रवाशांच्या सेवेसाठी की कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी' असा संतप्त सवाल प्रवासी वर्गातून होत आहे. कर्मचारी आणि अधिकारी यांच्या अशा स्वार्थी वृत्तीमुळेच एकेकाळी वैभवशाली दिवस पाहिलेल्या एसटीची डबघाईकडे वाटचाल सुरू असल्याची चर्चा होताना दिसते.

No comments:

Post a Comment