यर्तेनहट्टी ग्रामस्थांना पटले 'शिक्षणाचे' महत्त्व! प्राथमिक शाळेचे रूप पालटण्यासाठी सरसावले युवक - चंदगड लाईव्ह न्युज

27 November 2021

यर्तेनहट्टी ग्रामस्थांना पटले 'शिक्षणाचे' महत्त्व! प्राथमिक शाळेचे रूप पालटण्यासाठी सरसावले युवक

 

शाळा आवारात श्रमदान करत असलेले नवयुवक मंडळाचे कार्यकर्ते.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
गेल्या पंधरा वर्षापर्यंत अवैध व्यवसाय हेच उदरनिर्वाहाचे साधन समजणाऱ्या यर्तेनहट्टी या कानडी भाषिक गावातील नागरिकांना शिक्षणाचे महत्त्व पटू लागले आहे. स्थापनेपासून प्रथमच तरुण मंडळ व ग्रामस्थांनी गावातील मराठी प्राथमिक शाळेसाठी श्रमदान केले. हे त्याचेच द्योतक आहे. 
 पंचेचाळीस वर्षापूर्वी कर्नाटकातील हिडकल धरण जलाशयामुळे विस्थापित ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यावेळी चंदगड तालुक्याच्या पूर्व टोकाला काही गावांची निर्मिती झाली.  त्यातील घटप्रभा नदीच्या अलीकडे  वसलेले हे एक गाव. वीस वर्षांपूर्वी दड्डी नजीक घटप्रभा नदीवरील पूल होण्यापूर्वी हा गाव पूर्ण आडवळणी होता. दिवसाही या मार्गाने लोक जाण्यास घाबरत. शिक्षणाच्या अभावामुळे उदरनिर्वाहासाठी गावठी दारू विक्री व जंगलातील लाकडे यावर अवलंबून राहावे लागे. अशा अवैध धंद्यात आपल्या प्रगती ऐवजी अधोगतीच आहे याची जाणीव झाल्याने येथील ग्रामस्थ मुख्यत्वे दुग्ध व्यवसाय व शैलीकडे वळले. येथे बहुतांश बेरड रामोशी जातीच्या बांधवांचे वास्तव्य आहे. यांच्या अज्ञानाचा राजकारणी लोकांनीही गैरफायदा घेतल्याचे बोलले जाते. म्हणूनच शिक्षणाचे महत्त्व आत्ता त्यांच्या लक्षात येऊ लागले आहे.  पूर्ण प्रगती साठी गावातील शाळा समृद्ध होणे गरजेचे आहे या जाणिवेतून त्यांनी शाळेसाठी श्रमदानाचे कार्य हाती घेतले.
    पहिली ते चौथी चे वर्ग असलेल्या द्विशिक्षकी शाळेत विनायक गावडा व बाबू पुंडलीक पाटील हे शिक्षक गेल्या काही वर्षापासून कार्यरत आहेत. १०० टक्के कन्नड भाषिक गावात शैक्षणिक परिवर्तन घडवायचेच या उद्देशाने त्यांनी ग्रामस्थांना शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही! हे पटवून दिले. यामुळे प्रेरीत झालेल्या नवयुवक तरुण मंडळाने हातातील मोबाईल बाजूला ठेवून स्वच्छतेची साधने हाती घेतली. जेसीबी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने शाळा आवारात वर्षानुवर्षे वाढलेली काटेरी झाडेझुडपे, दगडधोंडे यांची सफाई करत शाळा परिसर स्वच्छ केला. याला ग्रामस्थांनीही उस्फूर्त प्रतिसाद दिला.
  तरुणाईला योग्य दिशा लाभल्यास गावचा विकास दूर नाही. याची प्रचिती आली. त्यांची शाळेबद्धलची तळमळ इतरांनाही प्रेरणादायी ठरु शकते. यामुळे नकळत शाळेतील बालमनावरही श्रमसंस्कार बिंबवले गेले. याकामी मंडळाचे पदाधिकारी अशोक बसवाणी नाईक, ओमकार सत्याप्पा नाईक, भीमा बसवानी नाईक, शिवाप्पा परशराम सनदी, लक्ष्मण भावकू नाईक व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. एकंदरीत शिक्षणाच्या तेजामुळे यर्तेनहट्टी येथील ग्रामस्थांच्या जीवनातील अंधकार लवकरच दूर होईल यात शंका नाही.


No comments:

Post a Comment