चंदगड : सी एल वृत्तसेवा
नागनवाडी पंचक्रोशीतील रुग्ण विशेषतः महिलांच्या नॉर्मल प्रसूतीसाठी खात्रीशीर ठिकाण म्हणून नागणवाडी येथील आयुष्मान आरोग्य मंदिर ची ओळख निर्माण होत आहे. येथे कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. ऋतुजा पोवार व त्यांच्या स्टाफने आपल्या रुग्णाभिमुख कार्यातून हे दाखवून दिले आहे.
या आरोग्य उपकेंद्रात सोमवार दि. २७/१०/२०२५ सकाळी बाळंतपणासाठी दाखल झालेल्या महिलेची नॉर्मल प्रसूती करण्यात आली. प्रसूती नंतर त्यांना डिलीवरी किट देण्यात आले. महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग मार्फत कार्यरत असलेल्या या आरोग्य उपकेंद्रात होणाऱ्या प्रसूती या पूर्णपणे मोफत असल्याने परिसरातील गरीब कुटुंबे व त्यांच्या नातेवाईकांसाठी आधार ठरले आहे. गेल्या सात-आठ महिन्यात येथे अनेक मातांची मोफत व नॉर्मल प्रसूती करण्यात आली आहे.
या कामी येथील डॉ ऋतुजा पोवार, परिचारिका प्रतिभा पाटील, आशा सेविका वर्षा धोनुक्षे यांचे परिश्रम कारणीभूत ठरले. त्यांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ बी. डी. सोमजाळ व डॉ सुधाकर पाटील (वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कानूर खुर्द) यांचे मार्गदर्शन लाभले.
नॉर्मल प्रसूती करणाऱ्या उपकेंद्रातील डॉक्टर व स्टाफचे माता व त्यांच्या नातेवाईकांनी आभार मानले.

No comments:
Post a Comment