सीमाभागातील मराठी बांधवांवरील अन्याय प्रश्नी एकीकरण समितीचे फडणवीस यांना साकडे, शिवाजीराव पाटील यांचा पुढाकार - चंदगड लाईव्ह न्युज

25 December 2021

सीमाभागातील मराठी बांधवांवरील अन्याय प्रश्नी एकीकरण समितीचे फडणवीस यांना साकडे, शिवाजीराव पाटील यांचा पुढाकार

देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना मराठी बांधव


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
गेली ६५ वर्षे सनदशीर मार्गाने सुरू असलेला सीमालढा दडपण्याचा कर्नाटक शासनाचा निरंतर प्रयत्न सुरूच आहे. या लढ्यात अनेक मराठी तरुणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. विविध लढे, तोडगे व आंदोलनानंतर महाराष्ट्र शासनाने सीमाप्रश्न २००४ साली सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. त्यानंतर  बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी हा मराठी बहुभाषिक भाग आपलाच आहे हे दाखवण्यासाठी कर्नाटक सरकार २००६ पासून बेळगाव येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरवत आहे. त्याला विरोध करत सीमाभाग महाराष्ट्राचे अविभाज्य अंग आहे, हे ठणकावून सांगण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दरवर्षी महामेळाव्याचे आयोजन केले जाते. यावर्षी १३ डिसेंबर २०२१ रोजी महामेळाव्याचे आयोजन केले. संविधानाच्या चौकटीत राहून मागितलेल्या सर्व परवानग्या जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाने नाकारत पोलिसांकरवी मेळावा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. तथापि मराठी भाषिकांनी आपला निर्धार सोडला नाही. हे घडत असताना काही कन्नड संघटना गुंडांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर हल्ला करून शाई फेकली. तसेच निष्पाप मराठी युवकांना अटक करून तुरुंगात डांबले आहे. त्यांना कर्नाटकच्या जाचातून तात्काळ मुक्त करण्यासाठी तसेच सीमा प्रश्न सोडवून मराठी भाषिकांना न्याय मिळवून द्यावा. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घ्यावी. याकामी आपण पुढाकार घेऊन सीमा भागातील जनतेच्या भावना केंद्र शासनापर्यंत पाठवाव्यात अशी विनंती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव च्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.
 निवेदनावर शुभम शेळके, सुरज कुडुचकर, श्रीकांत कदम, रवी निर्मळकर, शिवाजी मंडोळकर,  किरण मोदगेकर, सुरज कणबरकर आदी पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


No comments:

Post a Comment