चंदगड ग्रामीण रुग्णालयात डायलेसिस केंद्र...! माजी आ. राजेश पाटील यांच्या प्रयत्नांना यश, इमारत दुरुस्तीसाठी १ कोटी ९० लाख रु. मंजूर - चंदगड लाईव्ह न्युज

07 December 2025

चंदगड ग्रामीण रुग्णालयात डायलेसिस केंद्र...! माजी आ. राजेश पाटील यांच्या प्रयत्नांना यश, इमारत दुरुस्तीसाठी १ कोटी ९० लाख रु. मंजूर

डायलिसिस संग्रहित छायाचित्र

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

     मूत्रपिंड विकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना नियमित डायलिसिस करावे लागते. यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप व आर्थिक खर्च करावा लागतो. यापासून चंदगड तालुक्यातील अशा प्रकारचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची हाल बऱ्याच प्रमाणात कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस केंद्र सुरू करण्यास शासनाची मंजुरी मिळाली असल्याचे वृत्त आहे. 

   आपल्या तालुक्याचे माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अशा प्रकारचे डायलिसिस केंद्र चंदगड तालुक्यात व्हावे यासाठी मागणी व सातत्याने पाठपुरावा केला होता. याला यश येताना दिसत आहे. 

   मूत्रपिंड विकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना डायलिसिस उपचारासाठी आता कोल्हापूर, बेळगाव यांसारख्या दूरच्या ठिकाणी जावे लागणार नाही. तसेच अशा उपचारासाठी लाखो रुपये खर्च करण्याची गरज लागणार नाही. स्थानिक पातळीवरच या केंद्राच्या माध्यमातून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार असल्याने रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

   राजेश पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कित्येक वर्षांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला. ग्रामीण भागातील आरोग्य सेवेच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे हे फलित असल्याने तालुक्यातून समाधान व्यक्त केले जात आहे. लवकरच डायलिसिस उपचारासाठी आवश्यक यंत्रसामग्री, प्रशिक्षित कर्मचारी व सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर चंदगड तालुक्याच्या आरोग्य पायाभूत सुविधेला मोठी ताकद मिळेल.

 चंदगड प्रमाणेच जिल्ह्यातील मुरगुड, खुपिरे, शिरोळ, हातकणंगले येथेही अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नसून या कामी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. चंदगड येथील ग्रामीण रुग्णालय इमारतीची दुरुस्ती, सुशोभीकरण व सोयी सुविधा देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून १ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचेही पालकमंत्री यांनी सांगितले आहे.

डायलिसिस म्हणजे काय...?

  मूत्रपिंड निकामी झाल्यावर शरीरातील रक्त स्वच्छ करण्याची एक वैद्यकीय प्रक्रिया आहे, जी रक्तातील टाकाऊ पदार्थ, विषारी घटक आणि अतिरिक्त पाणी काढून टाकते, तसेच शरीरातील खनिजे संतुलित ठेवण्यास मदत करते, जे निरोगी मूत्रपिंड नैसर्गिकरित्या करतात. ही प्रक्रिया रक्ताला मशीनद्वारे फिल्टर करून शरीरात परत पाठवते, ज्यामुळे शरीराचे कार्य सुरळीत चालते, विशेषतः ज्यांना मूत्रपिंड निकामी झाल्याचा (Kidney Failure) आजार आहे. त्यांच्यासाठी डायलिसिस हा एक जीवनरक्षक उपचार आहे. 

No comments:

Post a Comment