‘गुड न्यूज’ - दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परिक्षेत मिळणार जादा वेळ, वाचा संपुर्ण बातमी..... - चंदगड लाईव्ह न्युज

25 December 2021

‘गुड न्यूज’ - दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परिक्षेत मिळणार जादा वेळ, वाचा संपुर्ण बातमी.....


तेऊरवाडी (एस. के. पाटील)

         विद्यार्थी मित्रहो, तुम्ही दहावी-बारावी बोर्डाच्या (SSC HSC Board) परीक्षेची तयारी करत आहात का? ऑनलाइन शिक्षणामुळे (Online Education) लिखाणाचा सराव कमी पडतोय का? परीक्षेच्या तीन तासांच्या वेळेत पेपर पूर्ण होणार का? असे प्रश्न तुम्हाला पडले असल्यास जरा इकडे लक्ष द्या! 

        महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल २०२२ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेत तुम्हाला पेपर सोडविण्यासाठी ३० मिनिटे म्हणजेच अर्धा तास अधिकचा मिळणार आहे.होय, परीक्षेदरम्यान पेपर सोडविण्यासाठी यंदा विद्यार्थ्यांना जादा वेळ मिळणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाने अधिकृतरीत्या स्पष्ट केले आहे. त्यामुळे दरवर्षी दहावी-बारावीच्या परीक्षेत तीन तासांचा असणारा पेपर यंदा साडेतीन तासांचा असेल. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय मोडली असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंडळाने यंदा हा निर्णय घेतला आहे.

        दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये ७० आणि त्यापेक्षा अधिक गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे आणि ७० पेक्षा कमी गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे अधिकचे मिळणार आहेत, असे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.विषयनिहाय वेळापत्रक जाहीरमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार ८० गुणाच्या पेपरला ३० मिनिटे आणि ४० गुणांच्या पेपरला १५ मिनिटे अधिक वेळ मिळणार आहेत.

    सविस्तर वेळापत्रक मंडळाचे संकेतस्थळhttps://www.mahasscboard.in यावर जारी करण्यात आले असून विद्यार्थी, शाळा आणि पालकांनी हेच वेळापत्रक प्रमाण मानावे आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही वेळापत्रक आणि माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे. तसेच परीक्षेपूर्वी शाळांकडे छापील वेळापत्रक देण्यात येणार आहे. त्या वेळापत्रकावरून खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षेस बसावे.आतापर्यंत ३० लाख विद्यार्थ्यांचे अर्जदहावी-बारावीच्या परीक्षेसाठी आतापर्यंत एकूण २९ लाख ५४ हजार ७४१हुन अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज सबमिट झाले आहेत. त्यात दहावीच्या १५ लाख २७ हजार ७६१, तर बारावीच्या १४ लाख २६ हजार ९८० विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे.लेखी परीक्षा कालावधीबारावीची परीक्षा (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम : ४ मार्च ते ३० मार्च २०२२माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान ऑनलाइन परीक्षा : ३१ मार्च ते ५ एप्रिल २०२२दहावीची परीक्षा : १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण विषय लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा : ५ एप्रिल ते १६ एप्रिल २०२२


विभागीयनिहाय अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या

     (आतापर्यंत) विभागीय मंडळ दहावी - बारावी पुणे २,६०,४५५- २,३९,७१९, नागपूर १,४९,८०२-१,५९,७४०, औरंगाबाद १,६६,५४६ -१,५९,६०८, मुंबई ३,४७,७९०-३,१५,४१३, कोल्हापूर १,२९,३२१-१,२१,६६४, अमरावती १,४९,४८८-१,५१,६०८, नाशिक १,८९,९३०-१,५९,९२६, लातूर १,०४,१९३-९०,१५२, कोकण ३०,२३६-२९,१५०, एकूण १५,२७,७६१ -  १४,२६,९८०. कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या लिखाणाचा सराव कमी झाला आहे. हे विचारात घेऊन यंदाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना पेपरसाठी वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ७०, ८० आणि १०० गुणांच्या पेपरसाठी अर्धा तास, तर ४०, ५० आणि ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे वाढवून देण्यात आल्याची माहीती शरद गोसावी (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ) यांनी दिली.

No comments:

Post a Comment