ढोलगरवाडी सर्पोद्यानची मान्यता रद्द होणार! 'सेंट्रल झू' कडून पुन्हा नोटीस, १० डिसेंबर पर्यंत म्हणणे मांडण्यासाठी मुदत - चंदगड लाईव्ह न्युज

02 December 2021

ढोलगरवाडी सर्पोद्यानची मान्यता रद्द होणार! 'सेंट्रल झू' कडून पुन्हा नोटीस, १० डिसेंबर पर्यंत म्हणणे मांडण्यासाठी मुदत


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

            ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील सर्पोद्यानची मान्यता रद्द करणेबाबत 'झू अथॉरिटी ऑफ इंडिया' ने तिसऱ्यांदा नोटीस बजावली आहे.  अटींची पूर्तता करण्याच्या सूचनेसह दोन वेळा दिलेली मुदत वाढ रद्द केल्यामुळे सर्पोद्यानचे निलंबन अटळ आहे. याबाबत डॉ. सोनाली घोष डेप्युटी  इंस्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट नवी दिल्ली यांनी संस्थेला नोटीस बजावली असून १० डिसेंबर पर्यंत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

            झू अथोरिटी ने गेल्या दोन वर्षात संस्थेला दोन वेळा मुदतवाढ दिली असली तरी कोरोना महामारी मुळे सर्वच शासकीय कार्यालये बंद होती. यात सर्पोद्यान साठी लागणाऱ्या किमान २५ एकर जमीनीचे संपादन अशक्य बनले. याकामी शेतकरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सर्पालय कार्याध्यक्ष तानाजी वाघमारे यांनी दरम्यानच्या काळात शासकीय कार्यालयांबरोबरच लोकप्रतिनिधी व महनीय व्यक्तींच्या घरांचे उंबरे झिजवले. तथापि अधिकारी व पदाधिकारी यांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे वाघमारे यांचे प्रयत्न अपुरे ठरले.

          गेल्या ६० वर्षांपासून ढोलगरवाडी येथे आद्य सर्पमित्र कै बाबुराव टक्केकर यांनी स्थापन केलेल्या सर्पोद्यानच्या माध्यमातून साप हा माणसाचा शत्रू नसून मित्र आहे, त्याच्याविषयीच्या अंधश्रद्धा दूर करून साप ही एक राष्ट्रीय संपत्ती आहे. हा विचार जनमानसात रुजवण्याचे कार्य केले आहे. नुकताच त्यांचा पाचवा स्मृतिदिन २५ नोव्हेंबर रोजी ढोलगरवाडी येथे अंधश्रद्धा निर्मूलन दिन म्हणून साजरा झाला. यावेळी अनेक वक्त्यांनी येथील सर्पोद्यान हे पर्यटन व अभ्यास केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जमीन व निधी द्यावा अशी मागणी केली होती. आजही येथे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातील वनविभाग, पोलीस खाते, भारतीय सैन्य दल, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, डॉक्टर, शेतकरी व नागरिकांसाठी माहिती, अभ्यास व संशोधन केंद्र सुरू असले तरी शासकीय मदत मिळाल्याशिवाय केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण व केंद्रीय चिडियाघर प्राधिकरण (सेंट्रल झू) CZA  च्या नियमात बसणे आहे.

         विशेष म्हणजे या सर्पोद्यान ची स्थापना कै. टक्केकर यांनी १९६६ ला केली. त्यावेळी १९७२ साली अस्तित्वात आलेला वन्य जीव संरक्षण  कायदा, महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण व केंद्रीय चिडियाघर प्राधिकरण (सेंट्रल झू) CZA हेच अस्तित्वात नव्हते. एकंदरीत हे सर्पोद्यान टिकणे ही काळाची गरज आहे. हे संबंधित झू अथोरिटी तसेच शासनाने ओळखले पाहिजे.


सर्पोद्यान मधील सर्व साप जंगलात सोडावे लागणार?

           तानाजी वाघमारे तसेच संस्थेतील सर्व घटकांची सर्पोद्यान मान्यता अबाधित ठेवणे व अटींच्या पूर्ततेसाठी धडपड सुरु आहे. तथापि लोकप्रतिनिधी, प्रशासन व शासनस्तरावरील उदासीनतेमुळे हे अभ्यास व संशोधन केंद्र तसेच आगळेवेगळे पर्यटन केंद्र इतिहास जमा होण्याची वेळ आल्याचे तसेच येथे असलेले तीस-पस्तीस जातीचे सर्प जंगलात सोडण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. असे सर्पोद्यान बाबत आपले म्हणणे मांडण्यासाठी मुंबई येथे जात असताना उद्विग्न स्वरात तानाजी वाघमारे यांनी सांगितले.
No comments:

Post a Comment