कागणी- कालकुंद्री रस्त्याला पुन्हा खड्ड्यांचे ग्रहण! ऊस वाहतूक करणारी चौथी ट्रॉली कोसळली - चंदगड लाईव्ह न्युज

02 December 2021

कागणी- कालकुंद्री रस्त्याला पुन्हा खड्ड्यांचे ग्रहण! ऊस वाहतूक करणारी चौथी ट्रॉली कोसळली

ओव्हरलोड डंपर रस्त्यासाठी कर्दनकाळ ठरत आहेत.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          सहा महिन्यापूर्वी केलेल्या कागणी ते कालकुंद्री या दीड किलोमीटर रस्त्याला पुन्हा खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. खड्ड्यांमुळे पंधरा दिवसातच रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावरून ओलम (हेमरस) साखर कारखान्याकडे वाहतूक करणारी चौथी ट्रॅक्टर ट्रॉली आज गुरुवारी दुपारी कोसळली. हंगाम सुरू झाल्यापासून महिनाभरातील ही चौथी घटना आहे. सुदैवाने चारही वेळा जीवितहानी झाली नाही.

वारंवार कोसळणार्‍या उसाच्या ट्रॉल्या वाहनधारक व ग्रामस्थांसाठी जीवघेण्या ठरत आहेत.

            संबंधित बांधकाम विभागाने नवीन टेक्नॉलॉजीच्या नावाखाली जानेवारी ते मार्च २०१९ मध्ये नवीन रस्ता केला होता. यावेळी जुना पूर्ण रस्ता दोन ते अडीच फूट खुदाई करून त्यातील जुना दगडी भराव अन्यत्र नेऊन टाकला होता. नंतर खडी भरुन डांबरीकरणासह नवीन रस्ता केला होता. तथापि २०१९ च्या अतिवृष्टीत नव्या टेक्नॉलॉजीने बनवलेला रस्ता पूर्ण उध्वस्त झाला. त्यानंतर २०२० व यावर्षी २०२१ च्या एप्रिल मे महिन्यात असा तीन वर्षात तीन वेळा खडीकरण व डांबरीकरण करूनही पुन्हा रस्ता खड्डेमय झाला आहे. यातील काही भाग खुदाई न करता त्यावरच डांबरीकरण केलेला भाग सुस्थितीत राहिला आहे. यावरून नवीन टेक्नॉलॉजी कुचकामी ठरल्याचे स्पष्ट होते. काळ्या मातीतील या रस्त्यावरून पावसाळ्यात निरंतर होणारी वाळू वाहतूक, त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसात रस्ता कामासाठी खडी भरून जाणारे चाळीस टन वजनी डंपर व  दौलत व हेमरस कडे होणारी ऊस वाहतूक यामुळे पंधरा दिवसातच रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. खाच-खळग्यांमुळे वाहने चालवणे मुश्कील झाले आहे. तर उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉल्या येताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करण्याची वेळ ग्रामस्थ तसेच दुचाकी, चारचाकी व बैलगाडी धारकांवर आली आहे. वारंवार खराब होणारा हा रस्ता 'स्पेशल' टेक्नॉलॉजी वापरून बांधकाम विभागाने नव्याने करावा अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment