म. फुले पुण्यतिथीला शिक्षक दिन साजरा करा - पुण्यतिथीदिनी पालकांची मागणी, म फु विद्यालयात पुण्यतिथी साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

02 December 2021

म. फुले पुण्यतिथीला शिक्षक दिन साजरा करा - पुण्यतिथीदिनी पालकांची मागणी, म फु विद्यालयात पुण्यतिथी साजरी

कार्वे (ता. चंदगड) येथे बोलताना निवृत्ती हारकारे, शेजारी इतर मान्यवर.

मजरे कार्वे / प्रतिनिधी

         कार्वे येथील म फु विद्यालयात महात्मा फुले यांची १३१ वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे चेअरमन एम. एम. तुपारे होते. मजरे कार्वे गावचे सरपंच शिवाजी तुपारे, उपसरपंच पांडुरंग बेनके, माजी उपसरपंच निवृत्ती हारकारे, मुरकुटेवाडी चे माजी सरपंच शामराव मुरकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. 

         प्रस्ताविक प्राचार्य एम. एम. गावडे यांनी केले व शाळेच्या प्रगतीचा आलेख मांडला. तसेच महात्मा फुले यांच्या जीवनपटावर प्रकाश झोत टाकला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट सादर केला. 

         जी पी वर्पे यांनी प्रमुख वक्ते म्हणून आपले मनोगत व्यक्त केले. महात्मा फुले यांच्या जन्माच्या पूर्वी त्यांच्या घराण्याचा इतिहास, त्याचबरोबर महात्मा फुले यांच्या जन्मानंतर त्यांना सहन कराव्या लागलेल्या हाल-अपेष्टा यासह त्यानी पहिली मुलींची शाळा सुरू करण्यासाठी केलेली धडपड, त्यातील अडचणी यांचा सारीपाट मांडला. तरुण भारतचे पत्रकार निवृत्ती हारकरे यांनी यापुढे २८ नोव्हेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जावा. कारण वयाच्या २१ व्या वर्षी म्हणजेच १९४८ साली  मुलींची शाळा सुरू करून त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजाला पटवून देण्याचे काम केले आहे. असे सांगितले. यावेळी लक्ष्मण सुरतकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना एम एम तुपारे यांनी परंपरागत  पुण्यतिथीदिनी होत असलेली भाषणे वगळून आज प्रत्येकानेच महात्मा फुले यांच्या जीवनावर वेगवेगळ्या विषयावर मत मांडले याबद्दल कौतुक केले व यापुढे महात्मा फुले यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे नियोजन केले जाईल असे जाहीर केले. कार्यक्रमास शाळेचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन रुपाली वणकुंद्रे यांनी केले. आभार पी. वाय. पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment