कोरज येथे आढळले दुर्मिळ खवल्या मांजर, 'चंदगड' च्या जैवविविधतेचा आणखी एक पुरावा - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2022

कोरज येथे आढळले दुर्मिळ खवल्या मांजर, 'चंदगड' च्या जैवविविधतेचा आणखी एक पुरावा


कालकुंद्री : श्रीकांत पाटील/ सी. एल. वृत्तसेवा

    सह्याद्री पश्चिम घाटात येणाऱ्या चंदगड तालुक्याच्या पश्चिम जंगल परिसरात शेकडो प्रकारच्या दुर्मिळ वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. या महिनाभरात तिलारी ते पारगड जंगल पट्ट्यात बिबट्या, पट्टेरी वाघ, दुर्मिळ किंग कोब्रा यांचा रहिवास अधोरेखित झाला आहे. त्याची प्रचिती नुकतीच कोरज (ता. चंदगड) येथे पुन्हा आली.

कोरज (ता. चंदगड) येथे सापडलेले खवल्या मांजर

   रविवारी दि. १६ रोजी रात्री ११ च्या सुमारास कोरज येथे बापू शिरगांवकर यांच्या घरासमोर विचीत्र प्राणी चालताना बापू शिरगांवकर यांच्या आईंनी पाहिला. त्यांनी हाक मारताच सर्वजण बाहेर आल्यावर लक्षात आले की हे खवले मांजर आहे.

    त्याला पकडण्यासंदर्भात काहींच माहीती नसल्याने याबद्दलची माहिती गुगल वर शोधून त्या पद्धतीने ज्ञानेश्वर शिरगांवकर यांनी धाडसाने त्याला पकडले. याकामी बाळासाहेब पेडणेकर, राजु आवडन, दिपक पेडणेकर, प्रथमेश शिरगांवकर व विठ्ठल पेडणेकर यांची मदत झाली. यानंतर गावातील सेवानिवृत्त वनरक्षक मारुती नावगेकर यांना घटनेची माहिती दिली.

     रात्र खुप झालेने शिरगांवकर कुटुंबियांनी खवले मांजराला रात्रभर सुरक्षित सांभाळले. सकाळी ॲड. संतोष मळविकर, पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर, वनपाल दयानंद पाटील यांना फोन वरुन माहिती दिली. माहीती मिळताच सर्व अधिकारी कोरज येथे येऊन पंचनामा केला. त्यानंतर खवले मांजर चंदगडचे वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले यांच्या स्वाधीन केले. यावेळी पोलीस निरीक्षक तळेकर, हनुमंत नाईक, कसेकर, ॲड. संतोष मळविकर, कोरज येथील विमल शिरगांवकर, बापू शिरगांवकर, ज्ञानेश्वर, वन अधिकारी वनपाल दयानंद पाटील, भरत निकम, ए डी वाझे, वनरक्षक सागर पाटील आदींची उपस्थित होती. त्यानंतर वन विभागाने खवले मांजराला त्याच्या नैसर्गिक आधीवासात सोडून दिले.


       वनविभागाकडून कौतुक-

वनक्षेत्रपाल भोसले यांनी शिरगावकर कुटुंबीय, कोरज ग्रामस्थांचे कौतुक केले. लोक आज दुर्मिळ प्राण्यांच्या तस्करीमधे गुंतलेले असताना दारात चालून आलेल्या अशा प्राण्याला कोणतेही प्रलोभन न ठेवता वन विभागाच्या हवाली केले. असे विधायक प्रवृत्तीचे लोक असल्यामुळेच पश्चिम घाटातील जैवविविधता टिकण्यास मदत होत आहे असे गौरवोद्गार काढले. या कामी ॲड. मळविकर यांचे लाभलेले सहकार्यही मोलाचे ठरते.
No comments:

Post a Comment