“निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाठीमागून अथर्व - दौलत कारखाना बंद पाडण्याचा घाट, तालुक्यातील मोठ्या राजकीय नेत्याच्या हात असल्याचा अध्यक्ष मानसिंग खोराटे यांचा आरोप - चंदगड लाईव्ह न्युज

04 February 2022

“निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाठीमागून अथर्व - दौलत कारखाना बंद पाडण्याचा घाट, तालुक्यातील मोठ्या राजकीय नेत्याच्या हात असल्याचा अध्यक्ष मानसिंग खोराटे यांचा आरोप

दौलत कारखानाचे संग्रहित छायाचित्र


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        दौलत कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांना पूढे करुन अथर्व कंपनीला वारंवार त्रास देण्याचे काम तालुक्यातील एक नेता करत असल्याचा आरोप करून आजच दौलत कारखाना सोडत असल्याचे अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलतच्या कार्यस्थळावर सांगितले. याबाबतचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी ही खंत बोलून दाखवली आहे.

          बरीच वर्षे बंद अवस्थेत असलेला दौलत कारखाना अतिशय कठीण व प्रतिकूल परिस्थितीत हा कारखाना अथर्व इंटरट्रेड कंपनीने चालु ठेवला आहे. या कंपनीने २०१९ पासून कारखाना चालवून गळीत हंगाम यशस्विरित्या पार पाडणेचे प्रयत्न केले आहेत. यापूर्वी आलेल्या कंपन्यानी हा कारखाना स्थानिक वेगवेगळया परिस्थितीमूळे चालविण्यास असमर्थता दाखविली व कारखाना बंद राहिला. त्यामूळे भागातील शेतकऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे नूकसान झालेले आहे. २०१९ पासून कंपनीने आज अखेर गळीत हंगाम यशस्वी सुरू ठेवून शेतकरी, तोडणी वाहतुकदारांची बिले व कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत दिलेले आहेत. या कारखान्याचा राज्यस्तरावर ही गुणवत्ता व कामकाजाबददल उल्लेख होऊ लागला आहे. कारखान्याने या वर्षीतर कमीत - कमी कालावधीत असणाऱ्या गाळप क्षमतेपेक्षा जादा गाळप करुन आजअखेर या कारखान्याने ४ लाख २५ हजार मे. टना पर्यंत गाळप करुन उच्चांक केलेला आहे. तसेच कारखान्याचे नियोजनबध्द कामकाजही सुरु आहे. कारखान्याने टप्या - टप्याने आधुनिकीकरण, विस्तारीकरण व ७० केएलपीडी इथेनॉल प्रकल्पही उभा केला आहे. जेणेकरुन भविष्यात याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा. यावर्षी कारखान्यात येणाऱ्या ऊसाला चांगला भाव दिला असून वेळेत ऊस बीले दिलेली आहेत. हा कारखाना भाडेतत्वावर घेऊन चालु झालेपासून शेतकरी, तोडणी वाहतुक कंत्राटदार, कामगार व छोटे मोठे उद्योगधंदे यांना आर्थिक दिलासा मिळालेला आहे. त्यामूळे कांही लोकांची राजकीय पोळी भाजण्यावर मर्यादा आली आहे. या कार्यक्षेत्रात चाललेली कारखान्याची घौडदौड रोखण्यासाठी काही मंडळी कार्यरत झाली असून याचाच एक भाग म्हणून या कारखान्याचे पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांकडून पूर्वीच्या देण्यापोटी या कारखान्यावर जाणीवपूर्वक १० जानेवारी १९ जानेवारी, ३ व ४ फेब्रुवारी रोजी या लोकांनी जाणीवपूर्वक कारखान्याचे गेट व कारखाना वजन काटा बंद पाडून कारखान्याचे गळीत बंद पाडले आहे. तसेच कारखान्याचे लाखो रुपयाचे नूकसान केलेले आहे. सदरचा कारखाना भाडेतत्वावर चालविणेस घेतलेपासून कारखाना सुस्थितीत चालु नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत. सदरचा कारखाना बंद राहिल्याने यापूर्वी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकरी बांधव, तोडणी वाहतुक यंत्रणा व छोटे मोठे उद्योगधंदे यांनी हालाकीचे दिवस काढले आहेत. सुदैवाने कार्यक्षेत्रातील सर्वाच्या सहकार्याने कारखाना सुरळीत चालु असताना हा कारखाना बंद कसा होईल याबाबत वेगवेगळया माध्यामातून त्रास देण्याचा तसेच तक्रारी करणेत येत आहेत. जेणेकरुन सदरचा कारखाना अडचणीत यावा व अडचणीत आलेल्या लोकांनी आपले पाठीमागे उभे रहावे हा दृष्ट हेतू ठेवणेत आला आहे. या सर्व बाबींचा कारखाना कार्यक्षेत्रातील सर्वांनी जाणीवपूर्वक विचार करावा. यापूर्वीही या लोकांकडून असा प्रयत्न करुन कारखाना चालविण्यास आलेल्या कंपन्याना कारखाना सोडणेस भाग पाडले आहे. अथर्व कंपनीने कारखाना हा केडीसीसी बँकेकडून भाडेतत्वावर घेतला असून दौलत व्यवस्थापन, जिल्हा बँक व अथर्व व्यवस्थापन यांच्यामध्ये काही अटी शर्ती ठरवून नोंदणीकृत करार झालेला आहे. त्यानूसार अथर्व कंपनीने ठरलेप्रमाणे वेळोवेळी सर्व हप्ते भरलेले आहेत. कराराचा कोणताही भंग केलेला नाही. त्यानूसार कंपनीचे कामकाज सुरु आहे. सद्यस्थितीत पाहता यामध्ये शेतकरी, तोडणी वाहतुक कंत्राटदार यांचे नूकसान झाले आहे. तसेच कारखाना कार्यप्रणाली बंद राहिल्याने कारखान्याचे लाखो रुपयाचे नूकसान झालेले आहे. आम्ही कारखाना हातात घेतल्यापासून आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी त्रास देणे चालू ठेवले आहे. ते कोर्टात गेले तेथे कोर्टाने त्यांना हाकलून दिले, कधी एमएसईबी तर कधी पोलिसांना सांगून कारखाना बंद करण्यासाठी ते प्रयत्न करत आहे. हिम्मत असेल तर समोर येऊन कारस्थाने करा असेही आव्हान खोराटे यांनी केले. आज आम्ही हा कारखाना या राजकीय नेत्याच्या त्रासाला कंटाळून सोडत आहोत. त्यामुळे आजपासून कारखाना बंद करा आणि आपल्याकडे आलेल्या ऊसाच्या गाड्या इतरत्र पाठवा असेही खोराटे यांनी सूचना दिल्या. दरम्यान, अजूनही दौलत प्रशासक आणि निवृत्त कामगार यांच्यात चर्चा चालू असल्याचे समजते.

No comments:

Post a Comment