चंदगड : सी एल वृत्तसेवा
कोरोना प्रादुर्भावाची स्थिती नियंत्रणात आल्यामुळे राज्यातील शालेय पोषण आहार योजनेस पात्र शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना १५ मार्च २०२२ पासून शाळा स्तरावर मध्यान्ह भोजन प्रत्यक्ष शिजवून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना व पूर्वतयारीचे पत्र कोल्हापूर जि. प. कडून शाळांना प्राप्त झाले आहे. या निर्णयाचे पालक व विद्यार्थी वर्गातून स्वागत होत आहे.
शाळांना प्राप्त मार्गदर्शक सूचनांमध्ये सरल प्रणाली अंतर्गत पोर्टल वरील माहिती अद्यावत करणे, आहार शिजवणाऱ्या यंत्रणेची निश्चिती करणे, कोविड प्रादुर्भावास प्रतिबंध करावयाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे. यात स्वयंपाकी व मदतनीस यांच्या दोन्ही प्रतिबंधक लसीकरणाची खातरजमा करणे, धान्य साठवणूक व स्वयंपाक करायच्या जागा, साहित्य यांची स्वच्छता व सुरक्षितता राखणे. वाटप करताना कोरोना नियमावलीस अनुसरून दक्षता बाळगणे आदी सूचना देण्यात आल्या आहेत.
चंदगड तालुक्यात गटशिक्षणाधिकारी सौ सुमन सुभेदार, शिक्षण विस्तार अधिकारी एम टी कांबळे यांनी सर्व शालेय पोषण आहार यंत्रणा सुसज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठेकेदारांमार्फत शाळांना तांदूळ व धान्य पाठवण्याची यंत्रणा सक्रिय झाली आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दोन वर्षानंतर प्रत्यक्ष लाभ मिळत असल्याने पालक व विद्यार्थी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment