दुंडगे बंधार्यावरून सुरु असलेली ट्रक सारख्या वाहनांची वाहतूक मोठ्या अपघातांना आमंत्रण देत आहे. |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
आत्तापर्यंत अनेकांचे बळी घेतलेल्या कुदनूर- दुंडगे (ता. चंदगड) गावांदरम्यान ताम्रपर्णी नदीवरील अरुंद बंधार्यावरून मोठ्या वाहनांची धोकादायक वाहतूक सुरूच आहे. यामुळे बंधाऱ्याचे संरक्षक गार्ड व लोखंडी रेलिंगचे नुकसान होत असून अशी वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी होत आहे.
दुंडगे नजीकचा अरुंद बंधारा ट्रॅक्टर, दुचाकी सगळ्यात अशा वाहनांना अपघात होऊन तसेच चालताना पडून अनेकांनी आपले प्राण गमावल्यामुळे नेहमी चर्चेत असतो. या बंधाऱ्यास समांतर पूल बांधावा किंवा आहे त्या बंधार्याची रुंदी वाढवावी अशी मागणी सुरू आहे. गेल्या दहा वर्षांतील आमदार, मंत्री व अन्य लोकप्रतिनिधींच्या आश्वासनानंतरही याकामी पुढील कोणत्याच हालचाली दृष्टिपथात नाहीत. दोन वर्षापूर्वी सलग अपघातांमुळे पुलाच्या दोन्ही बाजूस लोखंडी कमानी तयार करून मोठ्या वाहनांना अडथळा निर्माण करण्यात आला होता. हेमरस कारखाना प्रशासनाने याठिकाणी इशारा फलकही लावला होता. कमानी खालून केवळ जीप, रिक्षा, मोटरकार, दुचाकी अशी वाहने जाऊ शकत होती तथापि एक वर्षापूर्वी काही समाजकंटकांनी या कमानी खोलून काढल्या. त्यानंतर धोकादायकरित्या वाहतूक पुन्हा सुरू झाली ती दिवसेंदिवस वाढतच आहे. यात हेमरस कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारी व परतणारी रिकामी वाहने यांचा समावेश अधिक आहे. यामुळे बंधाऱ्यावरील गार्ड स्टोन, एका बाजूला बसवलेले लोखंडी पाइप चे संरक्षक रेलिंग ट्रक व टेम्पोच्या हौद्याला अडकून नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने पुन्हा मोठे अपघात टाळण्यासाठी दोन्ही बाजूला मजबूत लोखंडी कमानी पूर्ववत उभ्या कराव्यात अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment