चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हुंबरवाडी (ता. चंदगड) येथील मूळ रहिवाशी आणि सध्या नोकरीनिमित्त मस्कत ओमान इथे राहणारे तुकाराम मारुती पट्टेकर यांच्या १३ वर्षाचा मुलगा कुमार गगन तुकाराम पट्टेकर याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील Muscat Marathon स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत गावासह तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे.
ही आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन स्पर्धा, जगभरातील खेळाडूंच्या सहभागासह २४ जानेवारी २०२६ रोजी ओमान देशाची राजधानी मस्कत येथे पार पडली. गगनने या स्पर्धेतील Hypermax 5K प्रकार यशस्वीपणे पूर्ण करत २१ मिनिटे ५५ सेकंद असा वेळ नोंदवला. एकूण २,७६१ धावपटूंमध्ये १०९ वा क्रमांक तर पुरुष गटात १०४ वा क्रमांक त्याने पटकावला.
गगन हा हुंबरवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी सैनिक मारुती भीमाण्णा पट्टेकर तसेच निवृत्त मुख्याध्यापक शंकर कल्लाप्पा नंदनवाडे (रा. येणेचवंडी, तालुका- गडहिंग्लज) यांचा नातू आहे. या स्पर्धेत गगनसोबत त्याची आई माधुरी आणि बहीण गिरिजा (वय वर्षे ६) यांनीही सहभाग नोंदवला होता.
मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात मुलांना खेळ आणि आरोग्याकडे वळवणारी ही कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. गगनच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

No comments:
Post a Comment