जागतिक तापमान वाढीस मानव जबाबदार, वसुंधरेचे रक्षण करणे सर्वांचे दायित्व - डॉ. संदीप पाटील, चंदगड महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

15 March 2022

जागतिक तापमान वाढीस मानव जबाबदार, वसुंधरेचे रक्षण करणे सर्वांचे दायित्व - डॉ. संदीप पाटील, चंदगड महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात आयोजित ग्लोबल वार्मिंगचे शेती क्षेत्रावरील परिणाम या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेत बोलताना प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, शेजारी डॉ. एन. एस. मासाळ, डॉ. संभाजी सावंत व इतर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

              जागतिक तापमान वाढीस माणूस जबाबदार असून वसुंधरेचे रक्षण करणे आपल्या सर्वांचे दायित्व आहे. हरितगृह परिणाम, ओझोन वायूचा विरळ होत चाललेला थर यामुळे अवघे विश्व विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. वाढते प्रदूषण नियंत्रित करून नैसर्गिक साधन संपत्तीचे काळजीपूर्वक रक्षण आणि संवर्धन केले तरच जगाचा शाश्वत विकास शक्य आहे असे प्रतिपादन डॉ. संदीप पाटील यांनी केले. 

           चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगड येथे शिवराज अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत ग्लोबल वार्मिंगचे शेती क्षेत्रावरील परिणाम या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी साधनव्यक्ती डॉ. संदीप पाटील बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते. 

           दोन सत्रात संपन्न झालेल्या या कार्यशाळेसाठी साधनव्यक्ती म्हणून जे. पी. नाईक महाविद्यालय उत्तूर येथील डॉ. संदीप पाटील आणि डॉ. नंदकुमार मासाळ, र. भा. माडखोलकर महाविद्यालय चांडगड यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी अग्रणी महाविद्यालय समन्वयक डॉ. संभाजी सावंत यांनी कार्यशाळेचा हेतू स्पष्ट करून पाहुण्यांचा परिचय करून दिला.

          दुसरे साधनव्यक्ती डॉ. एन. एस. मासाळ यांनी ``जागतिक तापमान वाढीमुळे परिसंस्था, जैवविविधता, नैसर्गिक जलस्त्रोत आणि आरोग्यावर विघातक परिणाम घडत आहेत. बदललेली जीवनपद्धती आणि विकास निती यामुळे जीवनसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जंगलतोड, जंगलांना लागणाऱ्या आगी, औद्योगिक क्रांतीमुळे कार्बन व मिथेन यांचे वाढते प्रमाण यामुळे निसर्गावर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. निसर्गसंवादी जीवनशैलीचा लोप होत चालला असून जागतिक तापमान वाढ रोखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन डॉ. मासाळ यांनी केले.``

           कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पी. आर. पाटील यांनी तापमान वाढीचा यांनी अध्यक्षपदावरुन बोलताना ``निसर्गाचा समतोल टिकविण्यासाठी माणसाने व्यक्तिगत स्वार्थ व प्रलोभनांपासून दूर राहून गरजेपुरते मिळविण्याचा विचार स्वीकारायला हवा. अग्रणी महाविद्यालयाच्या कार्यशाळेतून वैचारिक देवाण-घेवाण होऊन विनिमय होत असून विद्यार्थी हिताचे उपयुक्त व स्थानिक पातळीवरील विषय विद्यार्थ्यांना ज्ञानसमृद्ध करणारे असतात असे प्रतिपादन केले.``

           कार्यशाळेसाठी डॉ. भूपाल दिवेकर, डॉ. महेंद्र जाधव, डॉ. कावळे, डॉ. के. एस. काळे, प्रा. एस. ए. पाटील, प्रा. एन. आर. हजगूळकर, प्रा. वंदना कांबळे, प्रा. आरती मुंडे, प्रा. श्रीदेवी गावडे, डॉ. जी. वाय. कांबळे (आजरा), गडहिंग्लज, चंदगड विभागातील महाविद्यालयातून समन्वयक, प्राध्यापक, विद्यार्थी, प्रशासकीय कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. आर. ए. कमलाकर यांनी केले. डॉ. एम. एम. माने यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment