क्रिप्टो करेंसी हा डिजिटल क्रांतीचा अपरिहार्य भाग - डॉ. विजय ककडे, चंदगड महाविद्यालयात कार्यशाळा - चंदगड लाईव्ह न्युज

07 April 2022

क्रिप्टो करेंसी हा डिजिटल क्रांतीचा अपरिहार्य भाग - डॉ. विजय ककडे, चंदगड महाविद्यालयात कार्यशाळा

चंदगड महाविद्यालयात क्रिप्टो करेंसी या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत बोलत डॉ. विजय ककडे, शेजारी प्राचार्य  डॉ. पी. आर. पाटील, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. संभाजी सावंत,  प्रा. व्ही. के. गावडे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          सध्याच्या काळात गुप्त चलन अर्थात क्रिप्टो करेंसी या विषयाची व्यापक चर्चा घडत आहे. हे एक प्रकारचे आभासी चलन असून या चलनव्यवस्थेचे स्वरूप समजून घेण्याची गरज आहे. डिजिटल क्रांतीचा हा अपरिहार्य भाग असून त्यासाठी विकसित तंत्रज्ञानाची निकड आहे. या चलनाचे काही फायदे आहेत त्यांची सविस्तर माहीत दिली. तसेच संभाव्य धोक्यांची जाणीव करून दिली. या चलनातील गुंतवणुकीस भारत सरकारने परवानगी दिलेली आहे. तथापि चलन म्हणून व्यवहारात वापर करण्यास अद्यापही याला मान्यता नसल्याचे साधनव्यक्ती डॉ. विजय ककडे यांनी सांगितले. 

      चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगड येथे शिवराज अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत क्रिप्टो करेंसी (कूटचलन) या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते. 

      दोन सत्रात संपन्न झालेल्या या कार्यशाळेसाठी साधनव्यक्ती म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील डॉ. विजय ककडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी अग्रणी महाविद्यालय समन्वयक डॉ. एस. एस. सावंत यांनी कार्यशाळेचा हेतू स्पष्ट करून क्रिप्टो करेंसीचा इतिहास स्पष्ट केला.

        कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी विद्यार्थीदशेतच विद्यार्थ्यांनी गुंतवणूकीच्या अशा प्रकारच्या नवनवीन बाबींची माहिती करून घेतल्यास भविष्यकाळात उत्पन्न मिळविल्यानंतर या ज्ञानाचा उपयोग करून आर्थिक साक्षर आणि संपन्न जीवन जगता येईल. यासाठी ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल. अग्रणी महाविद्यालयाच्या कार्यशाळेतून वैचारिक देवाण-घेवाण होत असून हे कार्यक्रम विद्यार्थी उपयुक्त ठरत असल्याचे मत व्यक्त केले. 

           कार्यक्रमास डॉ. के. पी. वाघमारे, प्रा. व्ही. पी. प्रधान, प्राध्यापक पी. टी. गोयल, डॉ. डि. जी. चिघलीकर, प्राध्यापक व्हि. डी. पाटील, सौथ इंडियन ताशिलदार, डॉ. आर. ए. कमलाकर, डॉ. एम. एम. माने, एम. एम. पिरजादे यांच्यासह आजरा, गडहिंग्लज, चंदगड विभागातील महाविद्यालयातून समन्वयक, प्राध्यापक, विद्यार्थी, प्रशासकीय कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन रोहण यादव यांनी केले. तर प्रा. व्ही. के. गावडे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment