चंदगड मधील कुदनूरमध्ये देशातील सर्वात उंच आश्वारूढ शिवमूर्ती बसवणार, बेळगावात तयार होतेय महाराष्ट्राचे आराध्य दैवत - चंदगड लाईव्ह न्युज

23 July 2022

चंदगड मधील कुदनूरमध्ये देशातील सर्वात उंच आश्वारूढ शिवमूर्ती बसवणार, बेळगावात तयार होतेय महाराष्ट्राचे आराध्य दैवत

संग्रहित छायाचित्र


तेऊरवाडी / एस. के. पाटील

            चंदगड तालुक्यातील कुदनूर गावात प्रतिष्ठापना  होणारी आश्वारूढ शिवमर्ती ही औरंगाबादप्रमाणे देशातील सर्वात उंच शिवमूर्ती पैकी एक असणार आहे. तब्बल २५ फूट उंच असणारी ही शिवमूर्ती बेळगाव शहरात घडवली जात आहे. यासाठी  मूर्तिकारांची रात्रंदिवस धडपड चालू आहे. 

            सिमा प्रश्नासाठी बेळगाव जसे सर्वाना परिचित आहे त्यापेक्षाही मूर्तिकारांचे शहर म्हणूनही बेळगाव नावारूपाला आले आहे.  आता शिवमूर्ती घडविणारे शहर अशी नवीन ओळख निर्माण होत आहे. महाराष्ट्र गोवा, कर्नाटक आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये बसविल्या जाणाऱ्या  बहूतांश शिवमूर्ती बेळगावमध्ये तयार होतात . सध्या अशीच एक भव्यदिव्य छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारुढ मूर्ती बेळगावात घडवली जात आहे. ही शिवमूर्ती तब्बल २५ फूट उंच असून देशातील सर्वात उंच शिवमूर्ती पैकी एक ठरणार आहे.  येथील भांदूर गल्ली येथे असणारे प्रसिद्ध मूर्तिकार विनायक मनोहर पाटील हे  गेल्या दोन महिन्यांपासून भव्यदिव्य शिवमूर्ती साकारत आहेत. २३ फूट लांब व १० फूट रुंद फौडेशनवर शिवमूर्ती साकारण्यात येत आहे. यासाठी ( मुंबई येथील चिकट माती ) चा वापर करण्यात आला 3 आहे. ३० किलोच्या २२० पिशव्या माती वापरून सध्या मूर्ती तयार करण्यात आली आहे. मूर्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक भागाचे मोल्ड तयार करून त्यानंतर कास्टिंग ओतले जाणार आहे. पंचधातूची मूर्ती तयार झाल्यानंतर अंदाजे ती चार ते साडेचार टन वजनाची होणार आहे. लोकवर्गणीतून  बेळगावपासून जवळ असणाऱ्या चंदगड तालुक्यातील कुदनूर या गावी या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. केवळ लोकवर्गणीतून अंदाजे ५० ते ६० लाख रुपये खर्चून ही भव्य शिवमूर्ती बसविली जाणार आहे . यासाठी  कुदनूर गावच्या ग्रामस्थानी २५ फूट शिवमूर्ती घडविण्याचे काम विनायक पाटील याना दिले आहे. शिवमूर्ती घडविताना कोठेही इतिहासाला तडा जाणार नाही, याची खबरदारी विनायक पाटील घेत आहेत. हि अतिभव्य अशी पंचधातूची शिवमूर्ती घडविण्यात येत असून यासाठी लागणारे मातीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यापुढील काळात मोल्ड तयार करून कास्टिंग केले जाणार आहे. नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात शिवमूर्तीची कुदनूर गावामध्ये प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मूर्तीकार विनायक पाटील यांच्या सोबत त्यांचे वडील ज्येष्ठ मूर्तिकार मनोहर पाटील संदीप, प्रसाद पाटील, विनोद गंजी, रमेश चौगुले, वैभव रेडकर, राजू लोहार हे सर्वजन मेहनत करून मूर्ती पडविण्याचे काम करीत आहेत.  बऱ्याच वेळा मोठ्या मूर्ती तयार करताना मूर्तिकारांकडून अनेक चुका होत असतात. अश्वारुढ शिवमूर्ती तयार करताना घोड्याचा समतोल, घोड्याच्या मानाने मूर्तीची उंची याचा विचार केला जात नाही. परंतु विनायक यांनी महाराष्ट्रातील अनेक मूर्तिकार व शिवअभ्यासकांना बोलावून माहिती घेऊन मूर्ती घडविली आहे. त्यामूळे ही मूर्ती चंदगड तालूक्याबरोबरच महाराष्ट्राचे वैभव ठरणार आहे हे मात्र निश्चित. औरंगाबादमध्ये ही देशातील सर्वाधिक उंच म्हणजे २५ फूट शिवपुतळा आहे. त्याबरोबरच कुदनूर मध्ये ही अशीच उंची असणार आहे.

No comments:

Post a Comment