'रवळनाथ'ची लवकरच पुणे, कराड, सांगलीला शाखा सुरू करणार - संस्थापक अध्यक्ष चौगुले, कार्यक्षेत्रात संपूर्ण कर्नाटक राज्याचा समावेश, ग्रामीण भागात चंदगड शाखा प्रथम, २६वी वार्षिक सभा उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

25 July 2022

'रवळनाथ'ची लवकरच पुणे, कराड, सांगलीला शाखा सुरू करणार - संस्थापक अध्यक्ष चौगुले, कार्यक्षेत्रात संपूर्ण कर्नाटक राज्याचा समावेश, ग्रामीण भागात चंदगड शाखा प्रथम, २६वी वार्षिक सभा उत्साहात

गडहिंग्लज येथे ग्रामीण विभागात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल चंदगड शाखेच्या चेअरमन सौ. पुष्पा नेसरीकर, प्रा. डॉ. आर. एन. साळुंके, शाखाधिकारी  दिपक शिंदेचा संचालिका सौ.मिना रिंगणे यांच्याहस्ते सत्कार झाला, शेजारी संस्थापक अध्यक्ष चौगुले उपाध्यक्ष मायदेव व संचालक मंडळ

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           श्री रवळनाथ को - ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी लि., आजरा (मल्टी - स्टेट) या संस्थेच्या कार्यक्षेत्रात संपूर्ण कर्नाटक राज्याचा समावेश करण्यास सभासदांनी २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी दिली. तर लवकरच पुणे, कराड व सांगली येथे संस्थेची शाखा सुरु करण्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष  एम. एल. चौगुले यांनी सभेत केली. येथील लायन्स ब्लड बँकेच्या सभागृहात सभा झाली. यावेळी पंच्याहत्तरीत पदार्पण केलेले २४ सभासद, ९ सेवानिवृत्त सभासद आणि विविध परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या सभासदांच्या १५ पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

          संस्थापक अध्यक्ष श्री . चौगुले म्हणाले, केवळ सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक आणि हितचिंतकांचा विश्वास आणि पाठबळ, संचालक, सल्लागार व कर्मचाऱ्यांचे योगदान यामुळेच संस्थेने २५ वर्षाच्या वाटचालीचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला. यापुढेही सर्वांनी अशीच साथ द्यावी. यावेळी विलासचंद हजारे, सदाशिव पिटके, सौ. पुष्पा नेसरीकर, विजय हरगुडे, यांनीही मनोगत व्यक्त केले. चर्चेत सुहास नाडगौडा, महावीर मरजे, के. व्ही. येसणे, संदेश गंध यांनी भाग घेतला. सीईओ. डी. के. मायदेव यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. मागील सभेचा वृत्तांत बोर्ड सेकेटरी सागर माने यांनी वाचला अहवाल, ताळेबंद व नफा तोटा पत्रकाचे वाचन संस्थापक  एम. एल. चौगुले, नफा विभागणी वाचन संचालक महेश मजती यांनी तर अंदाजपत्रक वाचन संचालक प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर यांनी केले. वैधानिक लेखापरीक्षण अहवाल स्विकृती व लेखापरीक्षण अहवाल दोष दुरुस्तीसह वाचन संचालक प्रा. विजकुमार घुगरे यांनी केले. वैधानिक लेखापरीक्षक नेमणूकीचा ठराव संचालिका सौ. रेखा पोतदार यांनी मांडला. 

             संचालक व नातेवाईकांकडील येणे कर्जाची यादी संचालक प्रा. विजय आरबोळे यांनी वाचली. सीईओ मायदेव यांनी पोटनियम दुरुस्तीचे वाचन केले. थकीत कर्ज खाती सूट रकमेचा ठराव संचालिका श्रीमती उमा तोरगल्ली यांनी मांडला. ऐनवेळच्या विषयांसह सर्व विषयांना चर्चेअंती एकमताने मंजुरी देण्यात आली. प्रारंभी जेष्ठ सभासद व संचालक यांच्या हस्ते श्री रवळनाथ व श्री काळभैरी फोटोचे पूजन व दीपप्रज्वलन झाले. संचालक प्रा . डॉ . दत्ता पाटील यांनी सूत्रसंचालन केले . उपाध्यक्ष प्रा. व्ही. के. मायदेव यांनी आभार मानले. सभेस संचालक सौ. मीना रिंगणे प्रा. डॉ. किरण पोतदार, सुशांत करोशे, डॉ. संजय चौगुले, शाखा चेअरमन प्राचार्य आनंद मेणसे (बेळगांव), प्राचार्य डॉ. के. एस. पाटील (जयसिंगपुर) प्राचार्य डॉ. पी. एम. हेरेकर (निपाणी), प्राचार्य आर. बी. पाटील (नेसरी), प्रा. डॉ. विनायक आजगेकर, अशोक येजरे (कुडा ) यांच्यासह शिवशंकर उपासे, नवनाथ शिंदे, बाबासाहेब आजरी, रंगा शिंगटे, संदीप पोटजाळे, नंदकुमार ढेरे आदीसह सर्वशाखाचे सल्लागार, सभासद, कर्मचारी उपस्थित होते.

           कोल्हापूर , चंदगड शाखेचा गौरव ठेव संकलन , कर्ज वितरण , थकबाकी वसुलीच्या उदिष्टपूर्तीमध्ये शहरी विभागात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल कोल्हापूर तर ग्रामीण विभागात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल चंदगड शाखेचे चेअरमन , सल्लागार व शाखाधिकारी यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला . • कर्जदारांना वीमा संरक्षण घरबांधणी व प्लॉट खरेदीसाठी २५ लाखापर्यंत कर्ज घेतलेल्या १३८५ सभासदांनाचा ५ लाखाचा अपघात विमा संस्थेतर्फे उतरविण्यात आला आहे . दुर्देवाने यातील कर्जदाराचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास ५ लाखाची भरपाई मिळेल. 

          ५० % अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपये तर अपघातानंतर उपचारासाठी १ लाख रुपये मिळतील व नोकरदार कर्जदारांना ५२ आठवड्यापर्यंत आठवड्याला ५ हजाराची मदत वीमा कंपनीकडून मिळेल , अशी माहिती संस्थापक अध्यक्ष श्री. चौगुले यांनी दिली. 'रवळनाथ'चे अभिनंदन व अपेक्षा गडहिंग्लज अर्बन बँकेला ऊर्जितावस्था देण्यात महत्वाची भूमिका व मोलाचे सहकार्य केल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष श्री चौगुले यांच्या अभिनंदनासह गडहिंग्लज साखर कारखानादेखील अडचणीतून बाहेर काढण्यासाठी रवळनाथने पुढाकार घ्यावा असा ठराव प्रा. रमेश पाटील यांनी मांडला. साधक - बाधक चर्चेअंती त्याला मंजुरी देण्यात आली.

No comments:

Post a Comment