एस. टी. महामंडळाने ग्रामीण भागात बस सेवा सुरळीत करावी, युवा एकता मंचचे मुख्यमंत्र्यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

25 July 2022

एस. टी. महामंडळाने ग्रामीण भागात बस सेवा सुरळीत करावी, युवा एकता मंचचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

ग्रामीण भागात एस टी महामंडळाने बस सेवा सुरळीत करावी या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना देताना भरमु नांगनूरकर 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बससेवा तातडीने सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी युवा एकता मंचचे भरमू नांगनूरकर व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एसटी गाड्या असुरळीत किंवा कमी प्रमाणात सोडल्या जातात. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या सोडाव्यात, एसटी महामंडळात नियोजनाचा अभाव असल्याने खाजगी फायदा वाहतूकदार उठवतात. खाजगी प्रवासात प्रवाशांची गैरसोय व लूटमार करण्याचा प्रकार खूप प्रमाणात होत आहे.  

          त्यामध्ये उन्हाळी सुट्ट्या व सणासुदीच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात तिकीट दर वाढवले जातात आणि त्याचा भुर्दंड हा सामान्य प्रवाशांना भोगावा लागतो. अनेकवेळा खाजगी वाहतूकदारांच्या मनमानीला प्रवासी बळी पडतात. किमान या न गोष्टीवर लक्ष केंद्रित करून व्यवस्थित मॅनेजमेंट केल्यास एसटी महामंडळाकडे पाठ फिरवलेल्या चाकरमान्यांना पुन्हा महामंडळानेआकर्षित करून एसटी महामंडळावर असलेला आर्थिक ताण दूर करण्यास नक्कीच मदत होऊ शकते, हा प्रश्न एका कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित नसून उर्वरित ग्रामीण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हा प्रवासाचा प्रश्न उद्भवतो. या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून हा विषय मार्गी लावावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी उमेश पाटील, योगेश गिलबिले, महादेव जांभळे, अमर प्रधान व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment