चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
आजपर्यंत तालुक्यातील एकही गाव असे नाही जिथे आम्ही मदतीच्या स्वरूपात पोहोचलो नाही. सामाजिक बांधिलकीतून केलेल्या कामामुळे जनतेशी आपुलकीचे नाते निर्माण झाले असून जनता माझ्या पाठीशी आहे. त्यांचा विश्वास आगामी निवडणुकीत मला निश्चितच मिळेल, याची मला खात्री आहे. सर्वसामान्य जनतेच्या व्यथा मला पूर्णपणे माहिती असून, सामाजिक कार्यकर्ते पती विलास पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावाशी आमचे नाते घट्ट झाले आहे. त्यामुळे कुदनूर जिल्हा परिषद गट माझ्यासाठी नवा नाही. मतदारसंघातील जनता मला भरभरून सहकार्य करेल, यात तीळमात्र शंका नसल्याचा विश्वास कुदनूर जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार विद्या पाटील यांनी व्यक्त केला. कालकुंद्री (ता. चंदगड) येथे आयोजित प्रचारावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील यांनी सांगितले की, स्व. बाबासाहेब कुपेकर, कै. नरसिंगराव पाटील आणि माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या माध्यमातून चंदगड तालुक्यासाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणला आहे. बसर्गे गावात उभारलेली अत्याधुनिक मराठी शाळा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. याच धर्तीवर तालुक्यातील मराठी शाळांच्या विकासासाठी माजी आमदार राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळ’ चिन्हावर माझी पत्नी जिल्हा परिषद निवडणूक लढवत असून मतदारांनी तिला विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कुदनूर पंचायत समितीचे उमेदवार मधुकर आंबेवाडकर यांनी आपल्याला परिसरातील प्रश्नांची सखोल माहिती असून ते प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत मतदारांनी संधी द्यावी, असे आवाहन केले.
या प्रचार सभेला प्रा. सुखदेव शहापूरकर, जिल्हा संघाचे माजी संचालक विनोद पाटील, गोपाळ ओऊळकर, बसवंत अडकूरकर यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment