तीन दिवसात चंदगड एसटी आगारास १८ लाखांचे उत्पन्न - चंदगड लाईव्ह न्युज

31 August 2022

तीन दिवसात चंदगड एसटी आगारास १८ लाखांचे उत्पन्न


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
            गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येवर दि. २८ ते ३० ऑगस्ट या तीन दिवसात चंदगड एसटी आगारास रु.१८,०८,९०८/- (अठरा लक्ष आठ हजार नेने आठ रुपये) इतके विक्रमी उत्पन्न मिळाले. गणेशोत्सवासाठी पुणे, मुंबई व कोकण मधून चंदगड कडे येणाऱ्या गणेशभक्त व चंदगड तालुका वासियांच्या सोयीसाठी चंदगड आगाराने ५६९ एसटी फेऱ्यांचे नियोजन केले होते. याचा लाभ २८७५६ प्रवाशांनी घेतला. यामुळे चंदगड आगारास विक्रमी उत्पन्न मिळाले. अशी माहिती चंदगड आगार व्यवस्थापक अमर निकम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
   बेभरवशाच्या खाजगी प्रवासी वाहतुकीस कंटाळलेल्या प्रवाशांनी मुंबई, पुणे आदी परिसरातून आपापल्या घरी जाण्यासाठी एसटी महामंडळाकडे बसेसची सोय करण्याची मागणी केली होती. त्यास अनुसरून अगार व्यवस्थापक व एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही सुविधा पुरवली होती. याला प्रचंड प्रतिसाद लाभल्याने एसटीला विक्रमी उत्पन्न मिळाले. यासाठी सहकार्य केलेल्या चंदगड तालुक्यातील विविध खात्यांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, शिक्षक व पत्रकार मित्रांनी केलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचे सांगत व्यवस्थापक अमर निकम यांनी प्रवाशांसह वरील सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. तर सर्व चाकरमानी गणेश भक्तांना सुखरूप व सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेणारे एसटी चे चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचारी व फेऱ्यांचे सुयोग्य नियोजन करणारे एसटी अधिकारी व कर्मचारी यांचे गणेश भक्तांतून कौतुक होत आहे. 
   वरील काळात लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या नियोजनामुळे  स्थानिक पातळीवरील २६ मार्गावरील फेऱ्या तीन-चार दिवस बंद होत्या. याबद्दल स्थानिक प्रवासी वर्गात काहीसा नाराजीचा सूर असला तरी दूर अंतरावर असलेल्या आपल्याच बांधवांची यामुळे सोय झाली याबाबत समाधान व्यक्त होत आहे.No comments:

Post a Comment