चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
केंद्राने आजरा तालुक्याचा पश्चिम भाग हा पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भाग म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे कारखान्याला केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाच्या संमतीचा अडथळा कायमच राहणार आहे. सरकारने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून हा भाग जाहीर करण्यापूर्वी कारखाना अस्तित्वात आला आहे हे केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे. यासाठी संचालक मंडळाने एकत्र राहून केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करण्याची गरज आहे हे शक्य झाले तरच या पुढे विविध प्रकल्प राबवता येतील, तसेच भविष्यात आजरा कारखान्यावर निर्माण होणाऱ्या इथेनॉल प्रकल्पासाठी जिल्हा बँक वित्त पुरवठा करू,अशी ग्वाही आमदार.हसन मुश्रीफ यानी दिली. ते गवसे (ता. आजरा) येथील साखर कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थानी खास. प्रा. संजय मंडलिक होते. कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ डॉ. नृसिंह एकनाथ गोसावी महाराज व आम. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रारंभी कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे यानी प्रास्ताविक करून यावर्षी साडेचार लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून प्रत्येक पंधरवड्यात ऊस उत्पादकांची बिले अदा करण्यात येतील. आंबेओहोळ व उचंगी प्रकल्पावर उपसा जलसिंचन योजना कशा उभा करता येतील याबाबत शेतकरी वर्गाला याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल असे स्पष्ट केले.
आम. मुश्रीफ पूढे म्हणाले, ``कारखान्यावर असणाऱ्या १२१ कोटी रु. कर्जाचे व्याज, कामगारांना द्यावा लागणारा ६० टक्के प्रमाणे पगार, कारखाना चालवत असताना सात कोटी रुपये इतका येणारा ऑपरेशन लॉस या सर्वातून बाहेर कसे पडायचे? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. यावर्षी कारखान्यातून कोणत्याही परिस्थितीमध्ये चार लाख मेट्रिक टन ऊस गाळपाच्या टप्पा पार करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. येत्या हंगामामध्ये ऊस वहातुकीकरीता प्रामुख्याने नव्याने होऊ घातलेल्या रस्त्याच्या निर्मितीचा अडथळाही राहणार आहे. यासाठी खा.संजय मंडलिक यांनी स्वतः लक्ष घालून रस्त्याच्या डागडुजीसाठी विशेष प्रयत्न करावेत असे आवाहनही आ. मुश्रीफ यांनी केले.
खास. प्रा संजय मंडलिक यांनी देशभरातील साखर उद्योग आजघडीला अडचणीत आहेत. साखर उत्पादनात जगामध्ये देशाने आघाडी घेतली असली तरी देशांतर्गत बाजारपेठेमध्ये साखरेचे दर वाढत नसल्याने साखर उद्योगासमोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. साखर कारखान्यांना याची प्रचंड झळ बसू लागली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी डिस्टिलरी प्रकल्पासह सहवीज प्रकल्पाशिवाय कारखान्यांना पर्याय नाही असा सल्लाही खास.मंडलिक यानी यावेळी दिला.
डॉ. नृसिंह गोसावी महाराज यांनी कारखाना समाजकारण म्हणून चालवावा. कारखान्याला वैभव प्राप्त करून देण्यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न करावा असे सांगितले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी, पं. स. चे माजी उपसभापती शिरीष देसाई, राजू होलम, जनार्दन बामणे, कार्यकारी संचालक डॉ. टी. ए. भोसले, स्वाभिमानीचे राजेंद्र गड्ड्यानावर, मनसेचे जिल्हाप्रमुख नागेश चौगुले सुधीर सुपल, मारुती देशमुख, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिकेत कवळेकर, युवराज पवार यांच्यासह संचालक व मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत ज्येष्ठ संचालक वसंतराव धुरे यांनी केले.सूत्रसंचालन एकनाथ गिलबिले यांनी केले तर आभार संचालक अनिल फडके यांनी मानले.
No comments:
Post a Comment