काळ्या दिनी बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या एकीची दर्शन, काळ्या दिनी मूक सायकल फेरीला सुरुवात, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी घोषणांनी परिसर दणाणला - चंदगड लाईव्ह न्युज

01 November 2022

काळ्या दिनी बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या एकीची दर्शन, काळ्या दिनी मूक सायकल फेरीला सुरुवात, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी घोषणांनी परिसर दणाणला

 

काळ्या दिनी फेरीमध्ये सहभागी झालेले मराठी भाषिक.

बेळगाव / सी. एल. वृत्तसेवा 

              बेळगाव सह सीमाभागातील मराठी भाषिकांनी काळ्या दिनानिमित्त बेळगावमध्ये मोठ्याप्रमाणात एकीचे दर्शन दाखवत मुक सायकल फेरीत अबला वृध्दासह मोठ्या संख्येने मराठी भाषिक सहभागी झाले होते. बेळगाव, कारवार, निपाणी बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला.

         काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर तमाम मराठी भाषिक सकाळपासूनच एकवटले होते. यानंतर सकाळी ९ वाजता म.  ए. समितीच्या नेतृत्वाखाली मूक सायकलफेरीला सुरुवात झाली. दंडाला काळ्याफिती, काळे कपडे परिधान करून युवक- युवती, महिलांसह, लहान मुलेही उस्फूर्तपणे या मूक सायकल फेरीत सहभागी झाली आहेत. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी ही सायकलसह मोर्चात सहभाग घेतला.

          बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह बहुल भाषिक सीमाभाग अन्यायकारकरीतीने कर्नाटकात डांबण्यात आला. याचा निषेध म्हणून  सन १९५६पासून १ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राजोत्सवादिवशी काळा दिन पाळण्यात येतो. म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली तमाम मराठी भाषिक एकत्र येत महाराष्ट्रात जाण्याची इच्छा प्रकट करतात. दरम्यान आजही 1 नोव्हेंबर काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीला धर्मवीर संभाजी उद्यानापासून आज सकाळी प्रारंभ झाला.

     मूक सायकल फेरीला सुरुवात होताचं मराठी भाषिकांनी, बेळगाव, कारवार, निपाणी बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय जात नाही, रहेंगे तो महाराष्ट्र में नही तो जेल में अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

                महिलांचा लक्षणीय सहभाग 

               सीमा प्रश्न सुटावा या मागणीसाठी रणरागिणीही लढा देत असून आज काळ्या दिनात सहभागी महिलांच्या संख्येने त्याचे प्रत्यंतर दिले आहे. यावेळी प्रतिक्रिया देताना माजी महापौर सरिता पाटील, म्हणाल्या, सीमा प्रश्न सुटावा या मागणीसाठी सन १९५६ अर्थात गेल्या ६६ वर्षापासून मराठी भाषिकांचा लढा सुरू आहे. मराठी भाषिक जनता या लढ्याची धार वरचेवर तीव्र करत चालली आहे. हा  लढा केवळ बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर आणि भालकीच्या नेत्यांचा नसून महाराष्ट्र सरकारचा आहे. हे महाराष्ट्र सरकारने लक्षात घ्यायला हवे. कारण  १९५६ साली भाषावार प्रांतरचनेनुसार महाराष्ट्रातील ८६५ खेडी व मराठी भाग म्हैसूर प्रांतात अन्यायकारक पद्धतीने डांबण्यात आला. तेव्हा महाराष्ट्राने त्यांचा प्रभाग कर्नाटकाच्या जोखडातून सोडवून घेण्यासाठी जातीने लक्ष घालण्याची गरज असल्याचे परखड मत माजी महापौर सरिता पाटील यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र सरकारचे सीमा प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले असून हा प्रश्न सुटावा म्हणून आता महाराष्ट्र सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.

            माजी उपमहापौर सौ. रेणू किल्लेकर म्हणाल्या, फक्त काळी फीत बांधून निषेध करणे योग्य नसून महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. आज आमची तिसरी पिढी सीमा प्रश्नासाठी लढा देत असताना महाराष्ट्र सरकारच्या निष्क्रिय भूमिकेबद्दल रेणू किल्लेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सीमा भागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्याय विरोधात महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र आले पाहिजे, महाराष्ट्राची ताकद आहे.  पण सरकार त्याचा वापर करत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. न्यायालयीन लढ्या बरोबर रस्त्यावरची लढाईही तितकीच महत्त्वाची आहे तेव्हा महाराष्ट्रातील नेत्यांनी रस्त्यावर उतरणे काळाची गरज आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.

           धर्मवीर संभाजी उद्यानापासून सुरू झालेली मूक सायकल फेरी उत्तर आणि दक्षिण भागाच्या विविध गल्ल्यांमधून कपिलेश्वर उड्डाण पुलमार्गे हळूहळू मराठा मंदिरच्या दिशेने मार्गस्थ होत झाली. मराठा मंदिर येथे मूक सायकल फेरीची सांगता झाल्यानंतर म. ए. समितीची निषेध सभा होणार आहे.

No comments:

Post a Comment