चंदगडची दौलत आधी सुरू करा व हंगाम संपल्यानंतर चर्चा करा, आजरा कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

07 November 2022

चंदगडची दौलत आधी सुरू करा व हंगाम संपल्यानंतर चर्चा करा, आजरा कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे याचे आवाहन

प्रा. सुनिल शिंत्रे


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगडची दौलत आधी सुरू करा व हंगाम संपल्यानंतर चर्चा करा असे आवाहन आजरा कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे यानी निवेदनाद्वारे आवाहन केले आहे. 

           गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी चार दशकापूर्वी साखर कारखान्यांची उभारणी सहकारात झाली. या उभारणीच्या काळात या विभागातील गोर - गरीब कष्टकरी शेतकऱ्यांनी भाग खरेदी करण्यासाठी दागिने गहाण ठेवले होते. शासनाकडे सातत्याने अनेकवर्षे पाठपुरावा केल्यानंतर या साखर कारखान्यांची उभारणी झाली. या तीन कारखान्यांमुळे शेतीचे चित्र जसे पालटले त्याच बरोबर या विभागाच्या विकासालाही गती मिळाली. गेल्या दशक भरापासून मात्र तिनही तालुक्यातील साखर कारखाने विविध कारणांनी अडचणीत आले आहेत. आजरा कारखाना काही वर्षे खाजगी तत्वाने द्यावा लागला होता.

                                                     जाहिरात

जाहिरात

           गडहिंग्लज कारखान्याची स्थिती सुध्दा तशीच आहे. चंदगड कारखाना काही वर्षे बंद होता. गेल्यावर्षी जिल्हा बँकेतर्फे खाजगी तत्वावर चालविण्यास देण्यात आला आहे. चंदगड कारखाना पुन्हा बंद पडण्याच्या स्थितीत आला आहे . त्याच्या कारणांची चर्चा येथे करण्याचे कारण नाही. परंतु शेतकरी आणि कामगार यांच्या जिवनाशी निगडीत असलेले हे प्रकल्प सहकारातच चालेले पाहीजेत. या बाबत कुणाचेच दुमत नाही. परंतु आर्थीक अडचणीमुळे काही वर्षासाठी कारखाना चालविण्यासाठी देण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. ही वस्तुस्थिती आहे. चंदगड कारखाना सुरू होता. तो आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे ही गोष्ट कुणाच्याच हिताची नाही. कारखाना बंद पडल्यानंतर शेतकरी आणि कामगारांची कशी होरपळ होते. याचा अनुभव तीनही तालुक्यांनी घेतला आहे. चंदगडचा गळीत हंगाम सुरू असताना व्यवस्थापनाने कारखाना चालविण्यास असमर्थता दाखविली आहे. त्याची कारणे काहीही असली तरी हा हंगाम पुर्ण होईपर्यंत सर्व वादाचे मुद्दे बाजुला ठेवणे आणि गळीत हंगाम यशस्वी करणे याला प्राधान्य देवून गळीत हंगामानंतर जे प्रश्न आहेत त्याबाबत मार्ग काढता येईल. 

          गेल्यावर्षी आजरा कारखाना बंद पडण्याच्या स्थितीत होता. परंतु शेतकरी आणि कामगार यांच्या हितासाठी कारखाना सुरू ठेवण्याचे आव्हान स्विकारले आणि जिल्हा बँकेसह सर्व स्तरावर सहकार्य मिळाले. कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी ठरला. इथे आणखी एक गोष्ट नमुद केलीच पाहीजे. आजरा कारखान्याच्या कामगारांनी कारखान्याची आर्थिक अडचण लक्षात घेवून अर्ध्या पगारावर काम करण्याला मान्यता दिली. हे उदाहरण संपुर्ण राज्यातच नव्हे तर देशभरात एकमेव असावे. हा आदर्श इतरांनी घेण्यासारखाच आहे. या साच्या ङपार्श्वभुमीवर चंदगडच्या दौलत साखर कारखान्याचा गुंता अवघड असला तरी सर्वांनी सहकार्य केले तर कारखाना सुरू राहु शकतो. राजकारणा पलीकडे जावून सर्वांनीच याचा जाणतेपणाने विचार करण्याची गरज आहे. कारखाना बंद पडणे हे कोणाच्याच हिताचे नाही. आणि म्हनुनच चालु गळीत हंगाम पुर्ण झाल्यानंतर दौलत कारखान्या संदर्भात जे प्रश्न आहेत त्यासाठी साखर संचालक आणि जिल्हाधिकारी यांच्यास्तरावर बैठक घेवून मार्ग काढता येईल. परंतु कारखाना बंद पडल्यानंतर सर्वांचेच कधीही भरून न येणारे नुकसान होणारे आहे. म्हणूनच या निवेदनाद्वारे आजरा कारखान्याचा अध्यक्ष या नात्याने सर्वांनाच कळकळीची विनंती करीत आहे.

No comments:

Post a Comment