खड्डेमय रस्त्यामुळे पाहुणे मंडळींनी फिरवली पाठ, कल्याणपूर रस्त्याची दुर्दशा संपणार कधी...! - चंदगड लाईव्ह न्युज

07 February 2023

खड्डेमय रस्त्यामुळे पाहुणे मंडळींनी फिरवली पाठ, कल्याणपूर रस्त्याची दुर्दशा संपणार कधी...!

कोवाड- बेळगाव राज्य मार्गा ते कल्याणपूर रस्त्याची खड्ड्यांमुळे झालेली दुरावस्था.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील कल्याणपूर गावाच्या रस्त्याची गेल्या चार वर्षापासून दूरवस्था झाली आहे. रस्त्याची ही दुर्दशा कधी संपणार असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

      कोवाड- बेळगाव या मुख्य मार्गापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर आत दुर्गाडी टेकडीच्या पायथ्याशी कल्याणपूर गाव वसले आहे.  गावाची लोकसंख्या दोनशेच्या आसपास असून येथे १०० टक्के 'महादेव कोळी, आदिवासी' बांधव राहतात. शेकडो वर्षे सोयी- सुविधांपासून वंचित असलेल्या कल्याणपुरवासीयांचे भोग स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही संपल्याचे दिसत नाहीत. कल्याणपूर या भारदस्त नावाने  तत्कालीन एका ब्रिटिश अधिकाऱ्यालाही भुरळ घातली होती. कल्याणपूरचे नाव ऐकताच या अधिकाऱ्यांने ''सब देखा लेकिन कल्याणपुर नही देखा..!" असे काढलेले उद्गार आजही लोकांच्या तोंडी आहेत. अशी 'ख्याती' असलेल्या या गावच्या रस्त्याचे काही वर्षांपूर्वी प्रथमच झालेले डांबरीकरण उखडून खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे.

       चंदगडचे आमदार राजेश पाटील मागील वर्षी एका कार्यक्रमासाठी येथे आले असता त्यांनी 'हा रस्ता केल्यानंतरच गावात पुन्हा पाय ठेवीन.' असे म्हटल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तथापि दोन  वर्षात साधी दुरुस्तीही झालेली नाही. रस्त्याच्या कारणामुळे पाहुणे मंडळीसुद्धा इकडे येण्याचे टाळत आहेत. अशी नामुष्कीची स्थिती आमच्यावर आल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. एकंदरीत संबंधित बांधकाम विभाग व आमदार साहेब यांनी लक्ष घालून कोवाड- बेळगाव मार्गा पासून कल्याणपूर गावापर्यंत चा रस्ता पावसाळ्यापूर्वी रुंदीकरणासह फेर डांबरीकरण करावा अशी मागणी होत आहे. या रस्त्याचा उपयोग फक्त कल्याणपूर ग्रामस्थांसाठी नसून पुढे बुक्किहाळ बुद्रुक, बुक्किहाळ खुर्द, करेकुंडी, सुंडी, महिपाळगड ते शिनोळी येथे बेळगाव वेंगुर्ला राज्य मार्गापर्यंत यावरून वाहतूक चालते.



No comments:

Post a Comment