चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
शिवणगे ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांचा सन्मान व स्वच्छतेसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गल्ल्यांचा गौरव करण्यासाठी भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाला ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला “खेळ पैठणीचा सन्मान नारीचा” हा महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला खास उपक्रम. शिवणगे गावातील सर्व वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आत्मविश्वास, कौशल्य व उत्साहाचे प्रभावी दर्शन घडवले. या उपक्रमातून नारीशक्तीचा सन्मान, आनंद आणि सामाजिक एकोप्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.
या स्पर्धेत पैठणीची मानकरी
सौ. संगिता मारुती पाटील
सौ. रेखा परशराम पाटील
सौ. स्मिता किरण पाटील
सौ. दिप्ती जोतिबा मुंगारे
सौ. रजनी निर्झर पाटील
सौ. वंदना नारायण पाटील यांनी अनुक्रमे बक्षिसे मिळवली.
याच कार्यक्रमात दीपावलीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ व सुंदर गल्ली स्पर्धेतील विजयी गल्ल्यांचा सन्मान व बक्षीस वितरण करण्यात आले. स्वच्छता, गाव सुशोभीकरण आणि एकोप्याने काम करणाऱ्या गल्ल्यांचे ग्रामपंचायतीतर्फे विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, ग्रामपंचायत क्युआर कोड, ग्राम सेल्फी पॉइंट यांसारख्या उपक्रमांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संतोष वसंत शिवनगेकर होते. यावेळी उपसरपंच सौ. सुमन जोतिबा सांबरेकर, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन होम मिनिस्टर फेम उत्कृष्ट निवेदक भावोजी संजय साबळे व रवी पाटील यांनी आपल्या बहारदार, विनोदी व प्रबोधनात्मक शैलीतून सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. मनोरंजनातून प्रबोधन हा त्यांच्या निवेदनाचा विशेष ठसा उपस्थितांच्या मनात कोरला गेला. नारीशक्तीचा सन्मान, स्वच्छतेचा संदेश आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरलेला हा उपक्रम ग्रामपंचायतीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे उत्तम उदाहरण ठरला असून ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.


No comments:
Post a Comment