प्रवाशी संघटनेचा १० रोजी विविध मागण्यांसाठी चंदगड आगारावर मोर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

07 February 2023

प्रवाशी संघटनेचा १० रोजी विविध मागण्यांसाठी चंदगड आगारावर मोर्चा

निवेदन देताना मान्यवर

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुक्यातील प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी चंदगड तालुका प्रवासी संघटनेमार्फत दि. १० फेब्रुवारी २०२३ रोजी  सकाळी ११.३० वाजता चंदगड एसटी आगारावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचे निवेदन संघटनेच्या वतीने आगार व्यवस्थापक अमर निकम यांना देण्यात आले.

   निवेदनात पुढील मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. चंदगड तालुका जिल्ह्यातील किंबहुना राज्यातील शेवटच्या टोकाला असल्यामुळे येथील आगाराला जुन्या जीर्ण बसेस पुरवल्या जातात. अशा बसेस रस्त्यात बंद पडून प्रवाशांचे हाल होतात. मनस्ताप सहन करावा लागतो, अनेक कामे चुकल्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे नव्या सुस्थितीतील गाड्यांची व्यवस्था करावी. आगाराकडे पुरेशा बस नाहीत, असे नेहमी सांगितले जाते. तसेच चालक, वाहकांच्या कमतरतेमुळे अनेक बस फेऱ्या अचानक रद्द केल्या जातात. याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसतो त्यामुळे बस संख्या वाढवण्याबरोबरच पुरेसा कर्मचारी वर्ग तैनात ठेवावा. कोणतीही फेरी रद्द न करता वेळपत्रकानुसार गाड्या सोडाव्यात. गाड्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होते. हे टाळण्यासाठी शाळा महाविद्यालयांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन वेळापत्रक निश्चित करावे. 

        पुणे, मुंबई आदी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वेगवान व गुड कंडिशन गाड्यांची व्यवस्था करावी. शैक्षणिक सहलीसाठी आकारल्या जाणाऱ्या अवाजवी भाडे नियमात दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना अधिक सवलती उपलब्ध करून द्याव्यात. आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदनावर जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, प्रा. एन. एस. पाटील, ॲड. संतोष मळविकर, विलास पाटील, रफिक नेसरीकर, एन. आर. भोगुलकर, बसवंत अडकुरकर आदींच्या सह्या असून या मोर्चात विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्रवासी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment