विचारशक्ती आणि चिंतनातून उत्तम संशोधक घडतात - प्रा. एन. एस. पाटील, हलकर्णी महाविद्यालयात विज्ञानादिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

01 March 2023

विचारशक्ती आणि चिंतनातून उत्तम संशोधक घडतात - प्रा. एन. एस. पाटील, हलकर्णी महाविद्यालयात विज्ञानादिन साजराचंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

           "विज्ञानाने मानवी जीवनात अनेक बदल घडवून आणले. अनेक शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधामुळे जग पूर्णपणे बदलले. विज्ञानाने तंत्रज्ञान दिले. परंतु विद्यार्थ्यांनी त्याचे फायदे आणि तोटे ओळखून आपली वाटचाल ठेवली पाहिजे. ज्ञानाच्या भुकेने व्याकुळ व्हा, मेंदूला चालना द्या. अभ्यास, प्रयत्न , निरीक्षण, वाचन यामुळेच चांगले संशोधक घडू शकतात" असे मत मराठी विज्ञान परिषद चंदगड तालुका अध्यक्ष प्रा . एन . एस . पाटील यांनी व्यक्त केले. 

       ते हलकर्णी येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभाग व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञानदिन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ बी. डी. अजळकर, प्राचार्य ए. एस. पाटील, प्रा. ए. एस. बागवान, डॉ. ए. व्ही. दोरुगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

   प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेश घोरपडे यांनी करून विज्ञान दिन साजरा करण्यामागचा उद्देश विशद केला. भारतरत्न सर सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेपूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

    प्रा. पाटील यांनी न्यूटन पासून ते सर सी. व्ही. रामन यांच्या पर्यंतचा विज्ञानात झालेल्या क्रांतीचा इतिहास, लार्ज हॅड्रॉन कोलायडर, ग्रेव्हिटेशनल   वेव्ह इ.  संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. "चाट जीपीटी  किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या जमान्यात विद्यार्थी वाचनापासून दूर गेला, विचारशक्ती संपली. ज्ञानाच्या भूकेने विद्यार्थी व्याकुळ झाला आणि ज्ञानाच्या मार्गावर गेला तरच आपला विद्यार्थी टिकणार. बदलत्या काळानुसार आपली शिक्षण व्यवस्था बदलणे गरजेचे आहे." असे मत त्यांनी व्यक्त केले. मराठी विज्ञान परिषदेचे सचिव प्राचार्य ए. एस. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. आपल्या पाचही इंद्रियांचा वापर करून वैज्ञानिक प्रयोग केले पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी  कोमल होणगेकर, समृद्धी मन्नोळकर, मंदिरा पाटील, प्रियांका पेडणेकर यांनी मनोगते व्यक्त  केली. महाविद्यालयात घेण्यात आलेल्या विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी रणजीत होणगेकर, कोमल होणगेकर, सोनाली गडकरी, मंदिरा पाटील, प्रियांका पेडणेकर या विद्यार्थिनींचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य बी. डी. अजळकर, प्रा. ए. एस. बागवान, डॉ. अशोक दोरूगडे, प्रा. एन. पी. पाटील, प्रा. सी. एम. तेली, प्रा. ए. एस. जाधव व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रेरणा कांबळे हिने केले. आभार प्रा. एस. एस. मोरे यांनी मानले.No comments:

Post a Comment