किसान सन्मान योजनेचा अकरा कोटी शेतकऱ्यांना लाभ - मंत्री सिंधिया, बसर्गे येथे जनजीवन योजनेचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

01 March 2023

किसान सन्मान योजनेचा अकरा कोटी शेतकऱ्यांना लाभ - मंत्री सिंधिया, बसर्गे येथे जनजीवन योजनेचा शुभारंभ

बसर्गे येथे जनजीवन योजनेच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना मंत्री ज्योतिरादित्य शिंधिया, शेजारी शिवाजीराव पाटील, धनंजय महाडिक, भरमूआण्णा पाटील, समरजित घाटगे, सचिन बल्लाळ.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

           यापूर्वी अनेक योजना झाल्या, पण नळ आहे पण त्यात पाणी नाही. आणि जिथे पाणी आहे त्या ठिकाणी गावात नळाची सोय नाही. अशी अवस्था झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी संपूर्ण भारतभर कमळ फुलविण्याचा संकल्प सोडला आहे. तोच संकल्प घेऊन मी कोल्हापूर जिल्ह्यात आलो आहे.असे प्रतिपादन केंद्रीय विमान वाहतूक व उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंधिया यांनी व्यक्त केले.                   

बसर्गे येथे जनजीवन योजनेचा शुभारंभ करताना मंत्री ज्योतिरादित्य शिंधिया

       ते बसर्गे (ता. चंदगड) येथील जलजीवन मिशन अंतर्गत एक कोटी ८३ लाख रुपयाची नळ पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील होते.  

        मंत्री सिंधिया पुढे म्हणाले, किसान सन्मान योजना देशात पहिल्यांदाच या सरकारने दिली आहे. याचा लाभ अकरा कोटी शेतकऱ्यांना होत आहे. हे सरकार भांडवलदारांचे नसून युवकांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे, गोरगरिबांचे आहे. यावेळी माजी मंत्री भरमुअण्णा पाटील म्हणाले, चंदगड तालुक्याचा विकास साधायचा असेल तर बेळगाव वेंगुर्ला हा रस्ता चार पदरी होणे गरजेचे आहे. येथील रेल्वे मार्ग पूर्ण होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शेजारच्या कर्नाटक राज्यात देण्यात येणाऱ्या सुविधा या विभागात सुद्धा मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. 

         खासदार धनंजय महाडिक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रस्ता, वीज,पाणी यांचा विचार करून काम सुरू आहे. १८ हजार गावात वीज पोहोचवली आहे.पन्नास वर्षात तीन कोटी घरानां नळ कनेक्शन व नऊ वर्षात सव्वातीन कोटी घरानां नळ कनेक्शन हा फरक या सरकारमध्ये दिसून येतो. ११ कोटी घरांना शौचालयच नव्हते ते मोदी सरकारच्या काळात मोफत देण्यात आले. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातील विकास कामे टप्प होती. जिल्हा नियोजन मधून चंदगड तालुक्यात यावर्षी पंधरा कोटी रुपये मिळाले आहेत. इतका निधी आजतागायत कधी मिळाला नव्हता. मंत्री सिंधिया यांनी बंद पडलेल्या कोल्हापूरच्या विमानतळासाठी२७४ कोटी रुपये मंजूर करून दिले आहेत. त्यातील सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत असे सांगितले. 

       भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे म्हणाले, जिल्ह्यात भाजपच्या नेतृत्वाखालील जास्त ग्रामपंचायती निवडून देण्याचं काम या चंदगड तालुक्यामध्ये झालं आहे. विकास कामे होत असलेली पाहता कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे कमळ फुलवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.

          कार्यक्रमास भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटील, जि. प. माजी सभापती ज्योतीताई पाटील, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, माजी सभापती शांताराम बापू पाटील, माजी सभापती बबन देसाई, माजी उपसभापती विठाबाई मुरकुटे, माजी उपसभापती मनीषा शिवनगेकर, सरपंच तुकाराम कांबळे, भाजपाचे तालुका अध्यक्ष नामदेव पाटील, भाजपाचे तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष अशोक कदम, सरचिटणीस प्रताप सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस रवींद्र बांदिवडेकर, माजी सभापती यशवंत सोनार, मार्केट कमिटीचे माजी सभापती उदयकुमार देशपांडे, तुकाराम बेनके, सरपंच आर.जी.पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. चिगरे यांनी केले. आभार गोकुळचे माजी संचालक दीपक पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment