बँकिंग व्यवहारांचे आधुनिकीकरण सर्वसामान्यांच्या हिताचे - चंद्रशेखर निंबुळकर, चंदगड महाविद्यालयात कार्यशाळा - चंदगड लाईव्ह न्युज

17 March 2023

बँकिंग व्यवहारांचे आधुनिकीकरण सर्वसामान्यांच्या हिताचे - चंद्रशेखर निंबुळकर, चंदगड महाविद्यालयात कार्यशाळा

चंद्रशेखर निंबुळकर बोलताना. व्यासपीठावर मान्यवर.

चंदगड  / सी. एल. वृत्तसेवा 

       "अलीकडे बँका सर्वसामान्यांच्या दाराशी आलेल्या आहेत. बँकांचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख बनत चालला आहे. बँकेमुळे जनतेत बचतीची सवय वाढीस लागली आहे. सुरक्षिततेसाठी बँकेच्या माध्यमातून व्यवहार करणे अत्यंत सोयीचे बनले आहे. बँकिंगमुळे अनावश्यक खर्चास आळा बसतो. उद्योगधंद्याच्या वाढीला प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच बँकेच्या व्यवहारांची माहिती घ्यायला हवी. तसेच बँकेच्या माध्यमातून स्वावलंबी बनण्याच्या पर्यायाचा विचार करायला हवा.' असे प्रतिपादन  बँक ऑफ इंडियाच्या चंदगड शाखेचे मुख्य प्रबंधक चंद्रशेखर निंबुळकर यांनी केले. 

          चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील शिवराज अग्रणी महाविद्यालयाच्या समूहांतर्गत आयोजित 'बँकिंग क्षेत्रातील आधुनिकीकरण व दक्षता' या विषयावरील कार्यशाळेत बोलत होते. अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य पी. आर. पाटील हे होते. अध्यक्ष प्रा. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी वेगाने बदलत असणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी. सुरक्षित आर्थिक व्यवहार कसे करावे याची माहिती घ्यावी, असे आवाहन केले. 

      दुसऱ्या सत्रात स्वप्नील जाधव यांनी बँकांकडून केला जाणारा पतपुरवठा दिली जाणारी विमा सुरक्षा याबाबत सुलभ भाषेत मौलिक विवेचन केले. प्रारंभी वृक्षाला जलार्पण करून कार्यशाळेची सुरुवात झाली. अग्रणी महाविद्यालय समन्वयक डॉ. एस. एस. सावंत यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एन. एस. मासाळ यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळेस महण प्रबंधक पी. श्रीकुमारव्ही. पी. प्रधान, महेंद्र जाधव, डी. जी. मिसळीकर, जी. जी .गायकवाड, के. पी. देशमुख, चंद्रकांत पोतदार, गुरुप्रसाद कुलकर्णी, डी. एम. पाटील यांच्यासह आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment